चेतन पाशीलकरची सातासमुद्रापार सुवर्ण भरारी

| अलिबाग | प्रतिनिधी |

जन्मापासूनच मुकबधीर असलेल्या चेतन पाशीलकरने आपल्या दिव्यांगावर मात करीत जिद्दीच्या जोरावर चित्रकलेमधून अगदी कमी कालावधीत स्वतःची ओळख निर्माण केली. नुकतीच फ्रान्समध्ये अ‍ॅबी ऑलंपिक स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व करीत सातासमुद्रापार सुवर्ण भरारी मारली आहे. त्याच्या या कामगिरीचे महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार यांच्याकडून सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या दिव्यांग विभागात त्याचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

चेतन हा सुधागड तालुक्यातील तळई गावांतील तरुण आहे. तो जन्मापासूनच मुकबधीर आहे. त्याचा प्राथमिक शिक्षण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील शाळेत झाले. त्याला शालेय स्तरापासूनच चित्रकलेची आवड आहे. त्याची ही आवड ओळखून त्याच्या वडीलांनी त्याला चित्रकलेत रमण्यासाठी प्रोत्साहन दिले. पुणे येथील जी. डी आर्ट विद्यालयात डिप्लोमा केला. त्यानंतर पुणे येथील भारतीय विद्यापीठातून डिग्री घेतली. शाळांसह वेगवेगळ्या ठिकाणी चित्रकला स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्यामध्ये घवघवीत यश संपादन केले. तालुका, जिल्हा, राज्य, देश पातळीवर झालेल्या चित्रकला स्पर्धेत त्याने आतापर्यंत 100 हून अधिक प्रशस्तिपत्रक व 50 ट्रॉफी मिळविल्या आहेत. त्याने दहा सुवर्ण पदक मिळविले आहेत. फ्रान्समध्ये अ‍ॅबी ऑलंपिक स्पर्धा पार पडलेल्या स्पर्धेत टाकाऊ वस्तूंच्या विषयावर चित्रकला स्पर्धा पार पडली. त्यात याने काढलेल्या चित्राने उपस्थितांची मने जिंकून सुवर्ण पदक प्राप्त केले.

Exit mobile version