| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचा टेस्ट स्पेशालिस्ट अन् ‘द वॉल 2.0′ चेतेश्वर पुजाराने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे. पुजारा भारताचा सर्वोत्तम कसोटीपटूंपैकी एक राहिला असून, त्याने अनेक विक्रम देखील केले आहेत.
भारतीय क्रिकेटर चेतेश्वर पुजाराने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त जाहिर केली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. पुजाराने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, भारतीय जर्सी परिधान करणे, राष्ट्रगीत गाणे आणि प्रत्येक क्षणी मैदानात उतरताना सर्वोत्तम देणे, या सर्व गोष्टींना शब्दात मांडणे कठीण आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीचाही शेवट असतो आणि सर्व प्रकारच्या भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा मी अत्यंत कृतज्ञपूर्वक निर्णय घेतला आहे. सर्वांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी आभार, असे ही पुजाराने पोस्ट मध्ये लिहिले आहे.
तसेच, पुजाराने या पोस्टमध्ये दोन फोटो शेअर केले असून त्यात त्याने म्हटले की, राजकोटसारख्या छोट्या शहरात पालकांसोबत असताना त्याने लहानपणी भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहिले होते. या खेळाने त्याला अनेक गोष्टी दिल्या आहेत. त्याला या खेळामुळे राज्याचे आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तसेच, पुजाराने त्याच्या पोस्टमधून बीसीसीआय, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यासह सर्व संघांचे, आयपीएल फ्रँचायझीचे आणि काऊंटी क्रिकेट संघांचेही आभार मानले आहेत.
पुजाराने ऑक्टोबर 2010 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो जवळपास 10 वर्षे सलग भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळला. राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर तो भारताचा तिसऱ्या क्रमांकावरील तो सर्वात भरवशाचा खेळाडू बनला. पुजाराला बाकी क्रिकेट प्रकारात फारशी संधी मिळाली नसली, तरी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये त्याची वेगळी ओळख निर्माण केली. भारताने 2018-19 आणि 2020-21 दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मिळवलेल्या कसोटी मालिका विजयांमध्येही पुजाराचे योगदान महत्त्वाचे राहिले होते. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर तब्बल 928 चेंडू चार कसोटीत खेळले होते. तो 2005 साली 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून विश्वचषकही खेळला. त्याने 278 प्रथम श्रेणी सामने खेळताना तब्बल 66 शतके आणि 81 अर्धशतकांसह 21,301 धावा केल्या आहेत. त्यातील भारतासाठी खेळलेल्या 103 कसोटी सामन्यांत त्याने 19 शतकांसह 7,195 धावा केल्या आहेत. नाबाद 206 ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली. त्याने भारतासाठी 6 एकदिवसीय सामने खेळताना 51 धावा केल्या आहेत.







