नाशिकच्या दोन्ही संघाची साखळीतील पहिल्या विजयाची नोंद
| ठाणे | वृत्तसंस्था |
नाशिकच्या महिला व पुरुष या दोन्ही संघानी ’22 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक’ कबड्डी स्पर्धेत पहिल्या साखळी विजयाची नोंद केली. ठाणे (प.) मेंटल हॉस्पिटलच्या बाजूला, परबवाडी येथील ‘स्व. धर्मवीर आनंद दिघे’ क्रीडानगरीत सुरू असलेल्या दुसर्या दिवशीच्या महिलांच्या ड गटात नाशिकने नागपूर ग्रामीणचा 37-20 असा पराभव केला. पूर्वार्धात चुरशीने खेळलेल्या या सामन्यात पहिला लोण देत 18-12 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी एक लोण देत सामना आपल्या बाजूने झुकविला. नाशिकची विदिशा सोनार या विजयाची शिल्पकार ठरली. नागपूरची सोनाली राठोड चमकली. नाशिकच्या पुरुष संघाने ब गटात वाशिमचा 67-25 असा धुव्वा उडविला. पहिल्या डावात 3 लोण देत 38-12 अशी आघाडी घेणार्या नाशिकने तोच जोश कायम राखत आणखी 2 लोण देत सामना एकतर्फी केला. पवन भोर, ईश्वर पठाडे यांच्या झंझावाती चढाया व सनी मते याच्या भक्कम बचावाला जाते. यवतमाळचे आयुष राठोड, राहुल भैसर बरे खेळले.
मुंबई शहरला आज संमिश्र यश लाभले. अ गटात मुंबईच्या पुरुष संघाने सांगलीचा 42-29 असा पराभव करीत साखळीतील सलग दुसर्या विजयाची नोंद केली. प्रणव राणे, विनोद अत्याळकर यांच्या चतुरस्त्र चढाया व ओमकार मोरेचा भक्कम बचाव या विजयात महत्वाचा ठरला. सांगलीकडून युवराज पाटील, अनिकेत जंगम यांनी बर्यापैकी लढत दिली. मुंबई उपनगरने मुंबई शहराला 41-39असे चकविले. पहिला लोण देत उपनगरने विश्रांतीला 21-15 अशी आघाडी घेतली. विश्रांतीनंतर सुर सापडलेल्या मुंबई शहरने लोण देत ही आघाडी कमी केली शेवटच्या काही मिनिटात ही एका गुणापर्यंत कमी केली होती. पण शेवटी उपनगरने बाजी मारली. हरजित संधू, सायली जाधव उपनगरकडून, तर पूजा यादव, पौर्णिमा जेधे मुंबईकडून उत्कृष्ट खेळल्या.
इतर निकाल संक्षिप्त महिला :- 1)क गट ठाणे वि. वि. अकोला(61-23), 2) अ गट पुणे वि. वि. कोल्हापूर(58-27), पुरुष :- 1) ड गट रत्नागिरी वि. वि. यवतमाळ(47-31), 2)क गट मुंबई उपनगर वि. वि. धुळे(39-25).