छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा

पुरुषांत मुंबई शहर, महिलांत पुणे उपांत्य फेरीत

| ठाणे | प्रतिनिधी |

मुंबई शहरने पुरुषांत, तर पुण्याने महिलांत ’22व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक’ कबड्डी स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक दिली. ठाणे, परबवाडी येथील ‘धर्मवीर स्व. आनंद दिघे’ क्रीडानगरीत सुरू असलेल्या पुरुषांच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या मुंबई शहरने नंदुरबारचे आव्हान 41-17 असे संपविले. सुरूवातीची 10 मिनिटे चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात पहिला लोण मुंबईने देत आघाडी घेतली. त्यानंतर हा सामना एकतर्फी झाला. पूर्वार्धात 15-08 अशी आघाडी मुंबईकडे होती. शेवटची 5 मिनिटे पुकारली तेव्हा 31-13 अशी मुंबईकडे आघाडी होती. उत्तरार्धात मुंबईने आणखी दोन लोण दिले. प्रणय राणे, विनोद अत्याळकर यांच्या झंझावाती चढाया त्यांना सिद्धेश तटकरेंची मिळालेली पकडीची साथ यामुळे मुंबईने आपला विजय साकारला. संचित शिंदे, जयेश महाजन, दीपक शिंदे यांचा पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात दिसला नाही.

महिलांच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या पुण्याने नांदेडचा 64-23 असा धुव्वा उडवीत आपणच या स्पर्धेचे दावेदार हे दाखवून दिले. पूर्वार्धात 3 लोण देत 37-11 अशी आघाडी घेणार्‍या पुण्याने उत्तरार्धात देखील त्याच तडफेने खेळ करीत आणखी दोन लोण देत गुणांचे अर्धशतक पार केले. आम्रपाली गलांडेचा झंझावात नांदेडला रोखणे जमले नाही. तिला चढाईत मंदिरा कोमकर, तर पकडीत दिव्या गोगावले, रेखा सावंत यांची मोलाची साथ लाभली. नांदेडच्या सानिका पाटील, सायली पाटील यांचा खेळ या सामन्यात बहरला नाही.

Exit mobile version