| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर शुक्रवारी (दि.12) पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या घटक पक्षातील प्रमुख पदाधिकार्यांच्या मेळाव्याचे आयोजन आकुर्ली येथील काकाजीनी वाडी येथे करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेकडो पदाधिकार्यांसाठी खास चिकनची मेजवानी ठेवण्यात आली होती. त्यामुळे या मेळाव्याची विशेष चर्चा परिसरात होती.
मावळ मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवारी श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी पनवेलमध्ये घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेळाव्यासाठी उपस्थित पदाधिकार्यांच्या जेवणासाठी शेकडो कोंबड्यांचा बळी देत आयोजित करण्यात आलेल्या चिकनच्या बेताचीच सर्वत्र चर्चा होताना दिसून येत होती. खासदारकीच्या मागील कार्यकाळात मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी कोणताही संपर्क न ठेवल्यानेच चिकनचा बेत आखून कार्यकर्त्यांना खुश करण्याचा प्रयत्न बारणे करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात यावेळी कार्यकर्ते करत होते.