जिल्हा उपनिबंधकासह मुख्य लिपीकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले!

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नोंदणी केलेल्या सोसायटीचा प्रलंबित निकाल देण्याकरिता मागितलेल्या लाच प्रकरणी अलिबाग येथील सहकारी संस्था कार्यालयाचे जिल्हा उपनिबंधक आणि मुख्यलिपिक लाच लुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे आणि मुख्यलिपीक सुहास दवटे यांना 40 हजाराची लाच स्वीकारताना अलिबाग लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे सहकारी संस्था कार्यलयात सुरू असलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.
रोहा अष्टमी येथील माऊली इन्कलेव्ह गृहनिर्माण सोसायटीच्या बिल्डरने सोसायटी करून दिली नसल्याने नोंदणीसाठी सभासदांनी अलिबाग येथील सहकारी संस्था कार्यालयात जिल्हा उपनिबंधक याच्यांकडे अर्ज केला होता. जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे यांच्याकडे हा अर्ज सोसायटी नोंदणीसाठी आला होता. सोसायटी नोंदणी प्रकरण हे मावळे यांनी मंजूर केले होते. मात्र तरीही निकाल प्रलंबित ठेवला होता. 23 सप्टेंबर रोजी प्रलंबित प्रकरणाची पडताळणी करण्याच्या दरम्यान मावळे आणि दवटे यांनी 40 हजाराची लाचेची मागणी करून 27 सप्टेंबर रोजी लाचेची रक्कम घेऊन येण्यास तक्रारदार सभासद याच्याकडे केली होती.
तक्रारदार यांनी मावळे आणि दवटे यांनी मागितलेल्या लाचे बाबत अलिबाग उपविभागीय अधिकारी लाच लुचपत कार्यलयाकडे तक्रार केली. तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीनुसार लाच लुचपत पथकाने अलिबाग येथील सहकारी संस्था कार्यालयात सापळा रचला. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून मुख्य लिपीक सुहास दवटे यानी 40 हजार रुपये स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. दवटेसह मावळे याना लाच लुचपत पथकाने अटक करून ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस हवालदार दीपक मोरे, महेश पाटील, कौस्तुभ मगर, सूरज मगर, पोलीस नाईक विवेक खंडागळे यांनी हा यशस्वी कारवाई केली.

Exit mobile version