| पाली/गोमाशी | वार्ताहार |
सुधागड तालुक्यातील संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयास ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. राज्य शासनाच्या शालेय विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान दिनांक 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात आले आहे. या अभियानात तालुक्यातील सर्व खाजगी अनुदानित शाळांनी सहभाग घेतला होता. सुधागड तालुक्यातील शाळांची तपासणी तालुकास्तरीय मूल्यमापन समितीने प्रत्येक उपक्रम निहाय करून मूल्यांकन केले. त्यामध्ये सुधागड तालुक्यात नांदगाव विद्यालयाचे तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकाचे तीन लाख रुपयाचे बक्षीस मिळविले आहे. शाळा सर्व सोयीनी पूर्ण करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरेश खैरे, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक आणि माजी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शाळेचे प्राचार्य संभाजी ढोपे, शिक्षक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेतली.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात सहभागी होऊन शाळेने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला याचे संस्थेचे अध्यक्ष म्हणून खुप आनंद होत आहे. या अभियानात प्रथम क्रमांक येण्यासाठी शाळेतील माझ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेतली या सर्वाचे मनापासून धन्यवाद.
सुरेश खैरे,
अध्यक्ष, भोराई शिक्षण प्रसारक मंडळ नांदगाव