भ्रष्टाचाराच्या आधारे सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान नको

सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी पुरस्कार नाकारला

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील सर्वहाराच्या नेत्या सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना जाहिर झालेला एबीपी माझा सन्मान हा पुरस्कार नम्रपणे नाकारला आहे. सदर पुरस्कार नवे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याने मतदारांचा, लोकशाहीचा व संविधानाचा मान न राखता हे सद्य सरकार भ्रष्टाचाराच्या आधारे सत्तेवर आले अशा व्यक्तींच्या हस्ते सन्मान स्वीकारणे माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला पटणारे नसल्याचे कारण देत उल्का महाजन यांनी हा पुरस्कार स्विकारण्यास नकार दिला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांची एबीपी माझा या वृत्त वाहिनीच्या वतीने माझा सन्मान पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे संपादक राजीव खांडेकर यांनी जाहीर केले होते. सदर कार्यक्रम 1 जुलैला होणार होता तो राज्यातील राजकीय घडामोडींमुळे पुढे ढकलला जाऊन आता 3 ऑगस्टला होत आहे. सदर कार्यक्रमात राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदर सन्मान प्रदान करण्यात येणार असल्याचे वृत्त वाहिनीने कळविले होते.

मात्र उल्का महाजन यांनी ज्या पद्धतीने मतदारांचा, लोकशाहीचा व संविधानाचा मान न राखता हे सद्य सरकार भ्रष्टाचाराच्या आधारे सत्तेवर आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अशा व्यक्तींच्या हस्ते (ते संविधानिक पदावर असले तरीही) सन्मान स्वीकारणे माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला पटणारे नाही असे स्पष्टपणे सांगित सदर सन्मान आपण नम्रपणे नाकारत असल्याचे म्हटले आहे. उल्का महाजन यांच्या या भुमीकेचे राज्यभरातून स्वागत करण्यात आले आहे.

Exit mobile version