| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
वयाची 75 वर्षे पुर्ण करणारे ज्येष्ठ नागरीक यांचा सन्मान तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना अलिबाग तालुक्यातील चौल येथील नारायण नाईक प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी सर्वाहारा जनआंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांच्या हस्ते त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य तथा शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, चौलचे माजी सरपंच प्रवीण राऊत, उपसरपंच अजित गुरव, ग्रामपंचायत सदस्य अतुल वर्तक, माजी सरपंच मधुकर फुंडे, चौल येथील जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश नाईक, माजी अध्यक्ष रमेश म्हात्रे, रेवदंडा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण रक्षणासाठी काम करणारे शैलेश राईलकर यांना समाज कार्य गौरव पुरस्कार, पर्यावरण रक्षण, प्रदूषण मुक्त व कचरा मुक्त गाव याकरीता कार्यरत असलेले राकेश काठे यांना राजाभाऊ राईलकर पर्यावरण स्नेही पुरस्कार, पत्रकार प्रफुल्ल पवार यांना लोकहितकारी पत्रकारीता पुरस्कार, आदेश नाईक व योगिता नाईक या दाम्पत्याला कृषि मित्र पुरस्कार तसेच सागर थळे यांचा सांस्कृतिक कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. चौल ग्रामपंचायत माजी सरपंच तसेच अलिबाग पंचायत समिती माजी सदस्य विश्वनाथ (भाई) मळेकर गौरवण्यात आले. गावातील अमृत महोत्सवी वयोमान (75 वर्षे) असलेल्या 48 नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर नाईक यांनी केले. विश्वस्त नंदकुमार नाईक, मंगेश नाईक, ललिता म्हात्रे, राजश्री नाईक, भक्ती रानवडे यांनी स्वागत केले. महेंद्र नाईक यांनी आभार व्यक्त केले असून सागर थळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास संयोजन समिती सदस्य मदन ठाकूर, हरिश्चंद्र म्हात्रे, सुधाकर राऊळ, हर्षदा म्हात्रे, जयवंत कंटक तसेच उत्कर्ष महिला मंडळ, युवक मंडळ यांनी सहकार्य केले.





