बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; व्यावसायिक सुखावले
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
दिवाळी सुट्यांमध्ये अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. शुक्रवार व शनिवारपासून पालीत भाविकांची मोठी रेलचेल सुरू झाली आहे. शाळा व महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्ट्या अजून 8 ते 10 दिवस असल्यामुळे पालीत भाविकांची मोठी वदर्ळ आहे. त्यामुळे येथील हॉटेल व्यावसायिक व दुकानदारांचा धंदा तेजीत आला आहे. मात्र, भाविकांच्या व इतर वाहनांमूळे पालीत वाहतुक कोंडी वाढत आहे.
बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक दाखल होत आहेत. त्यामुळे येथे चांगली आर्थिक उलाढाल होत असून, येथील स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत. पाली सुधागडात अनेक धार्मिक व पर्यटन स्थळे आहेत, पालीत आलेले भाविक सभोवतालच्या पर्यटन स्थळांना देखील आवर्जून भेट देताना दिसत आहेत. दिवाळी निमित्त मंदिराला विद्युत रोषणाई व आकर्षक फुलांची सजावट केली आहे. मंदिरात व मंदिराबाहेर मोठ्या व सुबक रांगोळ्या देखील काढल्या आहेत. दिवाळी सुट्टयांमुळे मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले आहेत. लॉजिंग बोर्डिंग वाल्यांचे आगाऊ बुकिंग झाले आहे. सध्या मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. यादरम्यान, पालीतील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. नाक्यावर तैनात असलेले वाहतूक पोलीस व बल्लाळेश्वर मंदिर ट्रस्टचे सुरक्षा रक्षक वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

वाहतुक कोंडी जटिल
येथील अरुंद रस्ते, विनाप्रवेशमधुन जाणारी वाहने, मोठ्या व अवजड वाहनांची रेलचेल, वाहतुकीचे नियम मोडणारे वाहन चालक आदी कारणांमुळे पालीत वारंवार वाहतूक कोंडी होते. सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात गाड्या व बसेस पालीत दाखल होत आहेत. अरुंद रस्त्यामुळे व अवैध पार्किंगमुळे दोन्ही बाजुने आलेल्या वाहनांना जाण्यासाठी जागा मळित नाही. परिणामी वाहने अडकून पडून वाहतूक कोंडी होते. हे थांबविण्यासाठी बाह्यवळण मार्ग लवकर करण्याची मागणी होत आहे.
भाविकांच्या येणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन योग्य व्यवस्थापन व नियोजन करण्यात आले आहे. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. नाममात्र दरात प्रसादालयामध्ये प्रसाद उपलब्ध आहे. सुरक्षारक्षक तैनात आहेत. भाविकांना राहण्यासाठी सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त आधुनिक दोन भक्त निवास आहेत. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. तसेच, सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.
जितेंद्र गद्रे,
अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली







