राजाभाऊ ठाकूर यांचा खळबळजनक दावा
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी एका मुलाखती दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांकनावरून खळबळजनक दावा केला आहे. ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांच्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला आहे.
राजाभाऊ ठाकूर यांनी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे तारणहार, ज्यांनी साडेबारा टक्के भूखंडाचा प्रश्न मार्गी लावला, त्या दि. बा. पाटील यांचेच नाव दिले पाहिजे, ही स्थानिक भूमिपुत्रांची मागणी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, त्यांनी सिडकोने विमानतळासाठी वापरलेल्या ‘एनएमआयएएल’ (नवी मुंबई किंवा नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड) या इंग्रजी आद्याक्षरांवरून त्यांनी संशय व्यक्त केला. ही आद्याक्षरे इतर कोणाच्यातरी नावाचे संकेत देत आहेत. जर स्थानिकांनी विरोध केला नसता तर विमानतळाला एनएमआय या आद्याक्षरांवरून नाव मिळाले असते, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, अन्याय होत असताना आजकालचे राजकीय नेते ईडी आणि सीबीआयच्या भीतीने गप्प बसतात. ते कॉन्ट्रॅक्ट आणि कमिशनच्या जाळ्यात अडकले आहेत. माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर असते तर त्यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला मिळाले यासाठी मोठी आंदोलने केली असती व सरकारला नाव द्यायला भाग पाडले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.






