महामार्गाच्या कामाचा फटका
| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठणे परिसरात शुक्रवारी (दि.25) सायंकाळी तुफानी पाऊस पडला. नागोठण्याच्या पूर्वेकडील डोंगरातून आलेले हे पावसाचे पाणी नागोठण्यातील आंगर आळी भागात मोठ्या प्रमाणात घुसले. त्यामुळे येथील नागरिकांचा एकच गोंधळ उडाला आणि या पाण्यामुळे नागरिकांचे नुकसानही झाले. मुंबई-गोवा महामार्गावर आंगर आळी लगत नुकताच सुरू करण्यात आलेल्या पुलाच्या कामात नियोजनाचा अभाव असल्यामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन या ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.
काही दिवसांपासून जिल्ह्यात तुफानी पाऊस पडत आहे. या दरम्यान, नागोठण्यातील आंगर आळीत मोठ्याप्रमाण पाणी आले होते. हे आलेले पाणी सुमारे दीड ते दोन फूट होते. डोंगरातून आलेले हे पाणी आंगर आळीतून वाहत जाऊन डॉ. कुंटे यांच्या दवाखान्यापासून श्री जोगेश्वरी माता मंदिर मार्गे नागोठणे पोस्ट ऑफिस पर्यंत आले होते. या पाण्याला मोठा वेग असल्याने आणि त्यातच नागोठण्यातील वीज वितरणाच्या अवकृपेने नेहमीप्रमाणे नागोठण्यातील वीज ही गुल झाली होती. त्यामुळे नागरिकांच्या घरातील अन्न-धान्याचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ज्या नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी आंगर आळी ग्रामस्थांच्यावतीने ग्रामपंचायत सदस्या भाविक गिजे व सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे यांच्याकडे करण्यात आली आहे.
सचिन कुलकर्णी यांची कार्यतत्परता
डोंगरातील पाण्याचा प्रवाह नागोठण्यातील आंगर आळी भागात घुसल्याचे समजताच नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी हे त्वरीत महामार्गावरील पुलाच्या ठिकाणी पोचले. त्यांनी त्वरित यंत्रणा कार्यान्वित केल्याने त्या ठिकाणी आलेल्या जेसीबी यंत्राच्या साहाय्याने पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग बंद करून हे पाणी दुसऱ्या मार्गे फिरवल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. यावेळी आंगर आळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जोपर्यंत पुलाचे व त्याखालील मोरींचे काम रीतसर व योग्य पद्धतीने करून पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला आवश्यक ती जागा निर्माण करीत नाही, तोपर्यंत पाण्याचा जुना मार्ग मोकळा करू नये. अशा स्पष्ट सूचना महामार्गाच्या कामाचे ठेकेदार कल्याण टोल प्लाझाच्या अधिकाऱ्यांना काही महिन्यापूर्वीच पत्राद्वारे कळिवले होते. त्यानुसार काम करताना काळजी घेण्याची गरज असतानाही ती न घेतल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी कल्याण टोल प्लाझाची आहे.
–सुप्रिया महाडिक,
सरपंच, नागोठणे
महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व वरिष्ठांकडून असल्याने आणि पावसाळा कमी झाल्याने महामार्गाचे काम आम्ही सुरू केले. मात्र, एवढ्या मोठ्या जोरात पाऊस येईल याची कल्पना नसल्याने अचानक आलेल्या पावसामुळे हे पाणी आंगर आळीत गेले. भविष्यात महामार्गाचे काम करताना योग्य ती काळजी घेऊ.
-विजय छन्ने,
वरिष्ठ अधिकारी, कल्याण टोल प्लाझा






