। मुंबई । प्रतिनिधी ।
बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे पुण्यातील आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांचीही हत्या करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आता विरोधकही संतापले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दोन्ही घटनांवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांना अशाच प्रकारे राज्य चालवायचे आहे का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (दि.11)प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न विचारण्यात आला. याबाबत ते म्हणाले की, निकाल लागून 20 दिवस झाले, तरीही मंत्रिमंडळाची स्थापना होत नाही आहे. गृहखातं कुणाला मिळणार, हेही ठरत नाही आहे. यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. बीड जिल्ह्यातले मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या हत्या झाली. त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यानंतर पुण्यातील मांजरीत आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ सकाळी मॉर्निंग वॉकला गेले. तेव्हा त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांचा थेट मृतदेह सापडला. भाजपाचे अनेक आमदार आणि पडलेले आमदार ज्या पद्धतीने धमक्या देतात, ही भाषा गुंडाना सुद्धा शरमेनं मान खाली घालायला लावणारी आहे, असे म्हणत राऊतांनी संताप व्यक्त केला.







