माणगाव तहसील येथे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना कार्यक्रम

। माणगाव । वार्ताहर ।

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या महसूल पंधरवड्यामध्ये माणगाव तहसील कार्यालय येथे शुक्रवारी (दि. 02) “मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना” शिबीर उत्साहात संपन्न झाले.

महसूल व वन विभागाकडील शासन निर्णयानुसार महसूल विभागामार्फत राज्यात सर्वत्र ‘महसूल पंधरवडा २०२४’ कार्यक्रम दि.1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान साजरा करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली व माणगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांच्या सूचनेनुसार माणगाव तहसील कार्यालय येथेही या पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला असून शुक्रवारी (दि. 02) ‘मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना’ शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी माणगाव तालुक्यातील युवांसाठी विविध प्रकारच्या रोजगार संधी आणि तांत्रिक प्रशिक्षण याबाबत जिल्हा नियोजन समिती रायगडचे सदस्य व जेसन पॉलिमर कंपनीचे प्रमुख लक्ष्मण नारायण जाधव, पॉस्को महाराष्ट्र कंपनीचे प्रशिक्षण तज्ञ सागर पोळ व टिकमभाई मेथा वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य हर्षल जोशी यांचे मार्गदर्शन सत्र ठेवण्यात आलेले होते. यावेळी माणगाव तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयांमधील 150 विध्यार्थी या प्रशिक्षण सत्रासाठी उपस्थित होते. तसेच, माणगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ.संदीपान सानप, माणगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार विकास गारुडकर तसेच सर्व नायब तहसीलदार व इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Exit mobile version