मुख्यमंत्र्यांचे मेहुणे ईडीच्या रडारवर

श्रीधर पाटणकरांची कोट्यवधींची संपत्ती जप्त
। मुंबई । प्रतिनिधी ।

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या उद्योग समूहावर ईडीने मंगळवारी धाडी टाकत पुष्पक ग्रुपची तब्बल 6 कोटी 45 लाखांची मालमत्ता जप्त केली. ठाण्यातील निलांबरी प्रोजेक्टमधील 11 फ्लॅट्स ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

पाटणकर यांच्या पुष्पक बुलियन या कंपनीवर ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये निलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे.

ठाकरे परिवाराला लक्ष्य
ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लाँडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती.

सध्या देशात या सगळ्या साधनांचा जो गैरवापर सुरू आहे, तो देशासमोरील मोठा आणि महत्त्वाचा प्रश्‍न आहे. हे सुडाचे राजकारण सुरू आहे. केवळ दुसर्‍यांना त्रास देणे या उद्देशाने तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. यात काय करता येईल, ते पाहूया. पण, स्पष्टच सांगायचं झालं तर, पाच ते दहा वर्षांपूर्वी ईडी ही संस्था नक्की काय आहे, हे बहुतांश लोकांना माहीत नव्हते. पण, आता मात्र ईडी गावागावात फिरत आहे.

खा. शरद पवार, राष्ट्रवादी अध्यक्ष
Exit mobile version