मुख्यमंत्र्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

| महाड | वार्ताहर |
महाडमध्ये चवदारतळे सत्याग्रहाच्या 96 व्या स्मृतीदिनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी महाडमध्ये भिमसागर लोटला. यावर्षी प्रथमच महामानवाला महाड पोलीस दलाच्यावतीने सशर्त मानवंदना देण्यात आली. यावेळी चवदार तळे येथे एक अधिकारी आणि 21 पोलीस बांधव सहभागी होते. मानवंदनेनंतर महाड शहर तसेच चवदारतळे, क्रांतीस्तंभ परिसर जय भीमच्या घोषणांनी दणाणून गेला. चवदार तळ्यावर ज्या ठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याला स्पर्श केला त्या पायर्‍यांवर भीम अनुयायांनी पाणी प्राशन करण्यासाठी आणि चवदारतळ्याचे पाणी कलशातून घेवून जाण्यासाठी एकच गर्दी केली होती.

मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
यावर्षी प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चवदार तळे येथे भेट देत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आ.भरत गोगावले, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नरनवरे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, बार्टी महासंचालक धम्माज्योती गजभिये, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नामदे, महाड तहसिलदार सुरेश काशीद, महाड मुख्याधिकारी महादेव रोडगे, पोलादपूर तहसिलदार दीप्ती देसाई आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी चवदारतळे विकासाला चालना दिली जाईल,अमृतसरच्या धर्तीवर चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबवला जाईल असेही स्पष्ट केले.

यावेळी विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. संपूर्ण राज्यातून उसळलेल्या भीमसागरामुळे चवदारतळे परिसर भीम जयघोषाने दणाणून गेला. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, बौद्धजन पंचायत समितीच्या मीराताई आंबेडकर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मनोज संसारे, भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम, आदी दिग्गज नेत्यांनी महाडमध्ये अभिवादन केले.

स्थानिक प्रशासनाकडून क्रांतीस्तंभ आणि चवदारतळे याठिकाणी मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य पथक आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येथील विविध संस्थांनी मोफत भोजन दानाची देखील व्यवस्था केली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजीक संस्था, हिंदूस्थान पेट्ोलीयम एस.सी – एस.टी.कामगार संघटना, भारतीय आयुर्वीमा महामंडळ एस.सी.एस.टी.कामगार संघटना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, एकविरा पतसंस्था, चवदार तळे विचार मंच, ओ.एन.जी.सी. एस.सी – एस.टी.कामगार संघटना, कोकण रिपब्लिकन संस्था, आदी संघटना तसेच भारतीय जनता पक्ष व अन्य संस्थांकडून मोफत भोजनदान तसेच पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रभाकर नारनवरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे धम्मज्योति गजभिये, पूजनीय राहुल बोधी महाथेरो, आदी उपस्थित होते.

Exit mobile version