मुख्यमंत्र्यांच्या मालमत्ता करमाफी घोषणेवर विधिमंडळात शिक्कामोर्तब

। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबईतील ५०० चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी मालमत्तांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याच्या मुख्यमंत्रीच्या घोषणेवर बुधवारी विधिमंडळात शिक्कामोर्तब करण्यात आला. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत यासंदर्भात मांडलेले विधेयक एकमताने संमत झाले. त्यामुळे १६ लाखाहून अधिक मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ३१ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मुंबई महापालिका क्षेत्रात ४६.४५ चौरस मिटर म्हणजेच ५०० चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी कारपेट चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी बांधकामाना कोणताही कर लावला जाणार नाही. सध्याची वाढती महागाईमुळे पालिकेचा मालमत्ता कर सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणारा नाही. तसेच करोनामुळे शहरातील अनेक व्यवसाय बंद झालेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याामुळे मालमत्ता कर भरणे लोकांना अडचणीचे आहे. त्यामुळे मालमत्ता करमाफी देण्यात येत असून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. विधानसभेत एकमताने हे विधेयक संमत करण्यात आले असून मुंबईकरांना १ जानेवारी २२ पासून करमाफीचा लाभ मिळणार आहे.

Exit mobile version