मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

रायगडात करणार प्रभावी अंमलबजावणी

| रायगड | प्रतिनिधी |

गावांचा शाश्वत विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. हे अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणार असून, या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. अभियानांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम तसेच आवश्यक सूचना संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिल्या आहेत. या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना राज्य शासनाकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात विकासाच्या बहुतांश योजना ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या माध्यमातून राबविण्यात येतात. त्यामुळे त्यांना कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता वाढविणे आवश्यक आहे. योजनांची प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणी करून, त्यांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे, ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, महाराष्ट्रातील थोर संत परंपरेचा सहभाग घेणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या मुख्य क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढवून पंचायत राज संस्था गतिमान करणे, या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राज्य शासनाने जाहीर केले आहे. हे अभियान तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य अशा चार स्तरांवर राबविले जाणार आहे. यामधून ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना मोठ्या रकमेचे पुरस्कार मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

सदर अभियान जिल्ह्यात सुनियोजितपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज होत आहे. प्रत्येक तालुक्यात अभियानासाठी 20 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली असून, सदर ग्रामपंचायतींकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. सदर अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कोकण विभागीय आयुक्त यांनी जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी म्हणून अप्पर आयुक्त आस्थापना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी प्रत्येक तालुक्यासाठी जिल्हा परिषदेच्या खाते प्रमुखांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पंचायत समिती स्तरावरावरील अधिकारी यांची ग्रामपंचायत स्तरावर पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.

कार्यशाळेचे आयोजन
या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा 8 सप्टेंबर रोजी कुरुळ येथील आरसीएफ सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे.
अभियानाचे प्रमुख सात घटक
लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन तयार करणे.
सक्षम पंचायत, स्वनिधी, विकासनिधी व लोकवर्गणीतून पंचायत राज संस्थांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे.
जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे.
मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे.
गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे.
उपजिविका विकास व सामाजिक न्याय
लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ
Exit mobile version