| आगरदांडा | प्रतिनिधी |
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुरूड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्ली-मांडला येथे मुख्यमंत्री जन आरोग्य अभियानाला सुरुवात करण्यात आली. हे अभियान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अक्षयकुमार सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्या ज्योती नागांवकर, मुरूड पंचायत समिती सभापती निलेश घाटवळ, सरपंच सपना जयपाटील, वैद्यकीय अधिकारी अक्षय पाटील, वैद्यकीय अधिकारी आशिया खान, आरोग्य सहाय्यक गणेश शिंदे, तालुका सिकलसेल सहाय्यक शालिकराव पावरा, आरोग्य सेवक राजेंद्र चुनेकर, आरोग्य सहाय्यक परीक्षित कोळी, आरोग्य सहाय्यक अमित करमळे, आरोग्य साहाय्यिक जयमाला वाघमारे, औषध निर्माता अधिकारी अनिकेत हजारे, सर्व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक आशा वर्कर, इतर कर्मचारी, स्थानिक नागरिक व मान्यवर उपस्थित होते.
तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अक्षय सोळंके राष्ट्रीय कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी सर्व लाभार्थी रुग्णांची आरोग्य तपासणी, विविध आजारांचे निदान, आवश्यक उपचार, आरोग्यविषयक जनजागृती तसेच शासकीय आरोग्य योजनांची माहिती सांगण्यात आली.
मुरूड पंचायत समिती सभापती निलेश घाटवळ यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणे हा शासनाचा प्राधान्यक्रम आहे. या अभियानामुळे आरोग्य सुविधा अधिक प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील. तरी या शिबिराच्या जास्त जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती निलेश घाटवळ यांनी जनतेला करण्यात आले.
मुख्यमंत्री जन आरोग्य अभियानामध्ये आरोग्य तपासणीमध्ये डोळे तपासणी, गरोदर माता तपासणी, मधुमेह तपासणी, सिकलसेल तपासणी, क्षयरोग तपासणी, कुष्ठरोग तपासणी, गर्भवती माता तपासणी, रक्त तपासणी, असंसर्गजन्य आजाराची तपासणी, एचआयव्ही तपासणी तसेच इतर आजारांची तपासणी करण्यात आली.







