। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरातील चवदार तळे परिसरामध्ये मागील काही दिवसापासून चिकनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले. याबाबतचे वृत्त समजतात महाड नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून तातडीने परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती या विभागाचे प्रमुख रोहित भोईर यांनी दिली आहे. मात्र, ही साथ संपूर्ण शहरभर पसरण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
चवदार तळे परिसरातील अनेक इमारतीमध्ये प्रत्येक घरात दोन ते तीन नागरिक चिकनगुनियाच्या आधाराने त्रस्त झाले आहेत. चिकनगुनिया साथीसंदर्भात नगरपरिषदेला अशा पद्धतीची माहिती प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अत्यावश्यक असणारी उपाययोजना बुधवारी सकाळपासूनच तातडीने अमलात आणण्यात आली आहे.
महाड शहरातील प्रसिद्ध असणाऱ्या ऐतिहासिक चवदार तळे व डोंगरे पूल या परिसरामध्ये स्वच्छता फवारणी मोहीम व धुराची यंत्रणांनी सर्व इमारती तसेच घरांच्या परिसरामध्ये आवश्यक फवारणी केली असल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली. मात्र, शहरातील नागरिक खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे उपचारासाठी जातात. त्यामुळे याबाबतची नेमकी वस्तुस्थिती व रुग्णांची आकडेवारीदेखील खासगी वैद्यकीय अधिकारी नगरपालिकेकडे उपलब्ध करून देत नसल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर या आजाराची लागण होण्यास सुरुवात झाली आहे.
यासंदर्भात महाड नगरपरिषदेकडून शहराच्या विविध भागांमध्ये याबाबतची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. महाड शहरात साधारणता 15 ऑगस्टनंतर चिकनगुनियाची रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली असताना देखील याची खबर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडे नसल्याने मोठ्या प्रमाणावर त्याचा फैलाव आता संपूर्ण शहरात पसरण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत नगरपालिकेने संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबवत असली तरी भाजीपाल्या विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर नाल्यामध्ये टाकण्यात येणारा कचरा शहरातील टायरवाले मोठ्या प्रमाणावर निकामी टायर ठेवत असल्याने त्यामध्ये डासांची होणारी उत्पत्ती होते. जागोजागी असणारे चायनीज सेंटर व त्यामुळे गोंगावणाऱ्या माशा, जवळच्या गटारात टाकण्यात येणारे खराब अन्न यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होत आहे.
याबाबत नगर परिषदेने तातडीने स्वच्छता मोहीम व नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्या भाजीपाला विक्रेत्या विरोधात व निकामी टायर ठेवणाऱ्याविरोधात तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले.






