कठीण श्रेणीतील जीवधन किल्ला केला सर
| रायगड | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील बालगिर्यारोहिका कुमारी शर्विका जितेन म्हात्रे हिने वयाच्या सहाव्या वर्षी अद्भूत कामगिरी करून अलिबागचे नाव देशात उंचावले आहे. ‘शतक गडकिल्ल्यांचे’ या तिच्या गेल्या साडेतीन वर्षापासून सुरू असलेल्या मोहिमेतून आज तिने शेवटचा म्हणजेच 100 वा कठीण श्रेणीतील जीवधन किल्ला सर केला. वयाच्या सहाव्या वर्षी तिने तब्बल 100 गडकिल्ले पायथ्यापासून सर करून एक नवा विक्रम प्रस्थापित करून आजच्या तरुणाईसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या साडे तीन वर्षापासून सुरू असलेल्या मोहिमेत कसलीही तमा न बाळगता प्रत्येक शनिवार आणि रविवारी तिने महाराष्ट्रातील रायगड, पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, नगर या जिल्ह्यातील तब्बल 100 गिरीदुर्ग सर केले आहेत.
विशेष म्हणजे तिने प्रत्येक गडाच्या पायथ्याच्या पवित्र मातीचा संग्रह केला आहे. ही माती आपल्या मावळ्यांच्या रक्तामुळे आणि शिवरायांच्या चरणामुळे पवित्र झाली आहे, अशी तिची धारणा आहे. सोमवारी, 25 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पुणे जिल्ह्यातील अतिकठीण जीवधन किल्ला सर केल्यानंतर गडाच्या माथ्यावर तिने ‘गडकिल्ले वाचवा,महाराष्ट्र वाचवा’ असा संदेश देणारा फलक झळकावला.किल्ला सर करून पायथ्याशी तिने 100 व्या किल्ल्याची माती गोळा केली.
त्यानंतर पायथ्याच्या घाटघर गावात तिचा घाटघर ग्रामस्थांकडून सत्कार देखील करण्यात आला. या सोहळ्यामध्ये तिने महाराजांच्या प्रतिमेचे आणि 100 गडांच्या पवित्र मातीचे पूजन केले. तिच्या या ऐतहासिक मोहिमेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 50 गिर्यारोहक सहभागी झाले होते. या आधी शर्विकाने अनेक विक्रम प्रस्थापित करून महाराष्ट्राचे नाव वर्ल्ड बुक ऑफ लंडनसह दहा रेकॉर्ड बुक मध्ये झळकावले आहे. तिच्या या कामगिरीची नोंद सुद्धा विविध रेकॉर्ड बुक मध्ये होणार आहे.