। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग शहरातील शिवाजी नगर येथील अल्पवयीन मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जागतिक महिला दिनाच्या दिवशी घडली असून, याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तन्मय राजकुमार दुधाडे (15) असे या मुलाचे नाव आहे. महाशिवरात्री व जागतिक महिला दिनानिमित्त सर्वजण व्यस्त असताना शुक्रवारी राहत्या घरात तन्मयने गळफास घेतला. ही बाब घरातील मंडळीच्या लक्षात आल्यावर त्याला तातडीने अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला अगोदरच मृत असल्याचे घोषित केले. तन्मयच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या गुन्ह्याचा तपास पोलीस पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमण महाले करीत आहेत.