जिल्ह्यातील शिक्षकांचे समुपदेशन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या असूनदेखील शिक्षक नसल्याने शिक्षणावर त्याचा परिणाम झाला होता. दरम्यान, रिक्त पदांच्या शिक्षकांची भरती करण्यात आली असून, त्यांचे समुपदेशन शनिवारी अलिबागमधील जिल्हा परिषदेच्या नाना पाटील सभागृहात करण्यात आले.
यावेळी शिक्षकांच्या पसंतीबरोबरच ज्या ठिकाणी रिक्त पदे आहेत, त्याठिकाणीच्या शाळांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रिक्त पदे असलेल्या शाळांना आता हक्काचे शिक्षक मिळाले आहेत. नियुक्त केलेल्या शिक्षकांना आठ दिवसांत शाळांमध्ये हजर होण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी दिले आहेत.
रायगड जिल्हा परिषदेच्या दोन हजारांहून अधिक शाळा असून, पहिली ते आठवीचे एक लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी असूनदेखील शिक्षक कमी असल्याची समस्या निर्माण झाली होती. रायगड जिल्ह्यात एक हजार 600 रिक्त शिक्षकांच्या जागी 721 शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. त्यात मराठी माध्यमासह उर्दू माध्यमांच्या शिक्षकांचा समावेश आहे.
अलिबाग येथील जिल्हा परिषदेच्या नाना पाटील सभागृहात शिक्षकांचे समुपदेशन ठेवण्यात आले. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही समुपदेशन प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव व शिक्षक उपस्थित होते. सकाळी अकरा वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरु झाली.दिवसभरात 532 उपशिक्षकांचे समुपदेशन करण्यात आले. शाळांची मागणी केल्यावर तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्तीचे पत्र शिक्षकांना देण्यात आले. आठ दिवसांत शाळेमध्ये हजर राहण्याचे आदेशदेखील यावेळी देण्यात आले. उर्वरित शिक्षकांचे समुपदेशन सोमवारी 11 मार्च रोजी होणार आहे.