तलावात बुडून बालकाचा मृत्यू

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील अंभेरपाडा येथील तुंगी गावातील तलावात बुडून 13 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घरातून बाहेर पडलेला हा मुलगा घरी परत न आल्याने त्याची शोधा शोध सुरू झाली. त्यांनतर तब्बल दीड दिवसांनी हा बालक तलावात शोध घेत असताना सापडला.

मिळालेल्या माहितीनुसार, तुंगी या उंचावर वसलेल्या दुर्गम भागातील गावात पूर्वीपासून ग्राम तलाव असून त्याची खोली कमी असल्याने उन्हाळ्यात आटते. येथे नळपाणी योजना राबविली जात असताना जलजीवन मिशन अंतर्गत या जुन्या ग्रामतलावाची खोली वाढविण्यात आली. त्याचवेळी या तलावात मोठ्या प्रमाणात मासे सोडण्यात आले आहेत. त्यामुळे गावातील तरुण वर्ग या तलावावर मासेमारी करून उदरनिर्वाह करतात. यादरम्यान, तुंगी येथील 13 वर्षीय मुलगा दुपारच्या वेळेस घरातून बाहेर पडला तो परत घरी आलाच नाही. ओमकार ज्यावेळी घरातून बाहेर पडला तेव्हा घरात कोणीच नव्हते. त्यामुळे गावातील लोकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. ग्रामस्थांनी रात्रभर शोध घेतला असता तो सापडला नाही. त्यामुळे नेरळ पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर सोमवारी (दि.23) ग्रामस्थांनी ग्राम तलावाच्या आजुबाजूला शोध घेतला. लोखंडी जाळी लाकडी काठीला बांधून तलावाच्या खोल पाण्यात शोध घेण्यात आला. अनेक प्रयत्नानंतर ओमकार आसवले याचा मृतदेह ग्रामस्थांच्या हाती लागला. त्या तलावाचे मागील दोन वर्षापूर्वी खोदकाम करताना निघालेले दगड तेथेच ठेवल्यामुळे हा अपघात घडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनि केला आहे.

Exit mobile version