। मुंबई । प्रतिनिधी ।
शौचालयात जाणार्या एका नऊ वर्षांच्या मुलाला पालिकेच्या कचरा वाहून नेणार्या डंपरने जबर धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गोवंडीतील शिवाजीनगर येथे आज सकाळी 11 वाजता ही घटना घडली. त्यानंतर डंपरचालकाला त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीकरिता संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. हमीद शेख असे मृत मुलाचे नाव आहे.
गोवंडीच्या बैंगणवाडी परिसरात राहणारा हमीद शौचालयात जाण्याकरिता मार्ग ओलांडत असताना अचानक डम्पिंग ग्राऊंडमध्ये कचरा खाली करून येणार्या भरधाव डंपरने त्याला जोरात धडक दिली. त्यामुळे हमीदचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या अपघाताची माहिती मिळताच संतप्त स्थानिक नागरिकांनी डंपरची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. नंतर आपला मोर्चा मानखुर्द-घाटकोपर मार्गावर वळवून रास्ता-रोको आंदोलन केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शिवाजीनगर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त जमावाची समजूत काढून वाहतूक पूर्ववत केली. मतीउर रेहमान तय्यब हुसेन सावंत (वय 31) या डंपरचालकाला त्वरित अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.