शेकाप कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांचा इशारा
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पडलेले खड्डे हे चांगल्या दर्जाच्या डांबराने बुजवावेत अन्यथा शेकापतर्फे 15 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशारा शेकाप पनवेल महापालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी आज पनवेल महापालिकेच्या उपायुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी त्यांच्यासोबत पनवेल शहर चिटणीस नंदकिशोर भोईर, पराग भोपी, संदेश डिंगोरकर, दि पनवेल अर्बन बँकेचे संचालक दिलीप कदम उपस्थित होते. या निवेदनात महादेव वाघमारे यांनी म्हटले आहे की, महानगरपालिका क्षेत्रातील खड्डे बुजविण्याकरिता महापालिकेने नेमलेल्या ठेकेदाराकडून चांगल्या दर्जाचे डांबर न वापरता खड्डे बुजविण्यात येत आहेत. या संदर्भात वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत. सध्या स्थितीत खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा फेज-1 आणि फेज-2 या ठिकाणी प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. दुचाकीसह चारचाकी वाहनांना या खड्ड्यांमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक वाहनांचे टायरसुद्धा फुटले आहेत. तरी सदर खड्डे बुजविण्यासाठी चांगल्या दर्जाच्या डांबराने बुजवावेत, अशी मागणी केली आहे.