बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

| ठाणे | प्रतिनिधी |

कसाराजवळील कळभोंडे लाद्याची वाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कृष्णा भागा आगीवले असे मृत बालकाचे नाव आहे. घराजवळील रानात रानमेवा गोळा करीत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कृष्णावर झडप घातली. या झटापटीत कृष्णाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कृष्णा आगीवले हा मंगळवारी (दि.21) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घराजवळ झाडावरील आंबे वा करवंदे गोळा करीत होता. यादरम्यान दडून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत झाला. या घटनेची माहिती स्थानिक गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली. या घटनेनंतर वन विभागाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिसरात बिबट्याचा वावर अनेक दिवसांपासून दिसत असल्याची माहिती स्थानिकांनी वन विभागाला दिली होती. मात्र कोणतीही ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्याने अखेर एका निष्पाप बालकाचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version