बालकांच्या सुरक्षिततेसाठी शासनाचे महत्त्वाचे पाऊल
| रायगड | प्रतिनिधी |
बाल लैंगिक शोषणाबाबत जनजागृती होण्याच्या उद्देशाने पहिलीच्या सुधारित अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक 1098 समाविष्ट करण्यात आला आहे. सात वर्षांपूर्वी तिसरीच्या पर्यावरणशास्त्र पुस्तकात याचा समावेश करण्यात आला होता. यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून पहिलीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यामुळे पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये देण्यात आला आहे.
चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक शून्य ते 18 वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी असून, संकटात असताना त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर पीडित मुलामुलींना तत्काळ मदत उपलब्ध होऊन त्यांना संरक्षण देखील दिले जाते. चाइल्ड हेल्पलाईनची माहिती होण्यामुळे मुलामुलींमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागून त्यांच्यात आत्मविश्वास वाढणार आहे.
सध्या बालविवाह, बालकामगार शोषणाच्या घटना घडताना दिसतात. एखादेवेळी विद्यार्थ्यांना अशी घटना लक्षात आल्यास किंवा त्यांच्याच बाबतीत असे काही घडल्यास, संबंधित बालकांना या चाइल्ड हेल्पलाईनवर संपर्क साधता येणार आहे. शाळेपासूनच विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच शिकवणे गरजेचे आहे. त्याची माहिती शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने देखील चाइल्ड हेल्पलाईन नंबर पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. 1098 या क्रमांकावर कॉल केल्यानंतर संबंधित बालकापर्यंत यंत्रणा पोचून त्याला मदत करणार आहे. मदतीची गरज असलेल्या मुलांना आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी 24 तास सुरु असणारी ही टोल फ्री फोन सेवा आहे.
शासनाचा हा चांगला प्रयोग आहे. चाईल्ड हेल्पलाइन क्रमांकाचा पुस्तकात समावेश केल्यामुळे त्याची माहिती सर्वांनाच होणार आहे. अनुचित प्रकारांना आळा बसेल. आतापर्यंत तक्रार कुठे करायची, याविषयी अनेकांना माहिती नव्हती. यामुळे लहान मुलांमध्येही जनजागृती शक्य होईल.
पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी
रायगड जिल्हा परिषद







