सहलींमुळे मुलांचा किलबिलाट

चार किल्ल्यांसह समुद्रात भिजण्याचा आनंद ; मासेमारीची घेतली माहिती

| रत्नागिरी | वृत्तसंस्था |

दापोली किनारी पर्यटनासाठी येणार्‍या शैक्षणिक सहलींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रासह विदर्भामधूनही या सहली समुद्रकिनारा पाहण्यासाठी येत आहेत. नववर्ष स्वागतासाठी 31 डिसेंबरला कसबा डिग्रज (ता. मिरज, सांगली) येथील न्यू इंग्लिश स्कूलची 166 विद्यार्थ्यांची सहल हर्णैत आली होती. किल्ला पाहण्यासह त्यांनी किनार्‍यावर फिरण्याचा आनंद घेतला.

निव्वळ समुद्र किंवा समुद्रात चालणारी मासेमारी हे पुस्तकातूनच शिकायला मिळते. परंतु प्रत्यक्षात भौगोलिकदृष्ट्या मुलांना त्याची माहिती देणे गरजेचेच असते. म्हणूनच सहलीसाठी समुद्रकिनारे निवडले जातात असे सहल घेऊन येणारे शिक्षक आवर्जून सांगतात. मासेमारी हा मोठा व्यवसाय असून तो कशाप्रकारे केला जातो, समुद्र कसा असतो, या ठिकाणी मासेमारी कशी होते, मासेमारी करणार्‍या बोटी कशा असतात, कोणते कोणते मासे या ठिकाणी मिळतात, माशांचं पुढे काय होतं, ते कसे निर्यात केले जातात, याचे व्यवहार ज्ञान मुलांना मिळावे हा फिरण्याबरोबरचा हेतू आहे.

हर्णै हे गाव ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध ठिकाण आहे. तेथे सुवर्णदुर्ग, फत्तेगड, गोवा किल्ला, कनकदुर्ग असे चार किल्ले आहेत. छत्रपती शिवरायांनी आरमार कशाप्रकारे उभे केले, सरखेल कान्होजी आंग्रे यांचा इतिहास याठिकाणी मुलांना पटवून सांगण्यात आला. या वेळी पापलेट, तोवर, हलवा, म्हाकुळ, सुरमई, कोळंबी, सुकी मासळी आदी माशांचे अनेक प्रकार आलेल्या विद्यार्थ्यांनी पाहिले. समुद्रात ढोपराएवढ्या पाण्यात उभं राहण्याचा आनंद मुलांनी लुटला. या वेळी बळीराम पेडेकर, रोहित रघुवीर या मच्छीमार बांधवांनी मासेमारी म्हणजे काय, ती कशी केली जाते याची माहिती दिली. वाळूत खेळण्याचा आनंदही विद्यार्थ्यांनी घेतला.

प्रत्यक्षात मिळते माहिती
विद्यार्थ्यांना मासेमारी आणि व्यवसाय याचे पुस्तकी ज्ञान असत. प्रत्यक्षात मासेमारी उद्योग काय असतो तो व्यवसाय करणारा हा मच्छिमार समाज कसा व्यवसाय करतो कोणकोणत्या प्रकारची मासळी मिळते. एकंदर मासेमारी व्यवसायाचे संपूर्ण ज्ञान प्रत्यक्षात मिळवण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना हा परिसर दाखवण्यासाठी आणले आहे.


विठ्ठल देवकाते
न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे शिक्षक
Exit mobile version