पोर्ट औद्योगिक क्षेत्राला विरोध
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
शहराजवळील सडामिऱ्या-जाकीमिऱ्या भागातील खासगी क्षेत्र पोर्ट औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, मिऱ्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत या औद्योगिक क्षेत्राला एकमताने विरोध करण्यात आला असून असा ग्रामसभेचा ठराव करण्यात आला. याची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. तसेच, याबाबत एमआयडीसीला काही सांगायचे असेल तर दोन्ही गावांची एकत्रित बैठक घ्यावी, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली. याला सरपंच आकांक्षा कीर यांनी दुजोरा दिला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास भूसंपादन कार्यवाही करण्याबाबतची अधिसूचना 29 जुलैला प्रसारित झाली आहे. विविध वस्तूंचा साठा, व्यवस्थापन, वितरण आणि वाहतुकीसाठी या क्षेत्राचा विकास होणार असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. मात्र, याला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. मिऱ्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये जाकीमिऱ्याची ग्रामसभा झाली. या ग्रामसभेला सरपंच आकांक्षा कीर, बाळ माने, कौस्तुभ सावंत यांच्यासह सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेत विषय पत्रिकेवरील विषयानुसार चर्चा करण्यात आली.
यावेळी आम्हाला पर्यावरणपूरक उद्योग हवेत. यामध्ये आमची कलमे, घरं जाणार आहेत. याला आमचा ठाम विरोध असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे. या औद्योगिक क्षेत्राला सर्वांनी कडाडून विरोध केला आहे. तसा एकमुखी विरोधाचा निर्णय घेऊन ठराव करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या ठरावाची प्रत दिली जाणार असून नोटिसांना देखील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तसेच, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना याबाबत आपले म्हणणे मांडायचे असले तर त्यांनी जाकीमिऱ्या, सडामिऱ्या दोन्ही गावांची एकत्रित बैठक लावावी, असे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.