शाळा प्रवेशाचा प्रश्न गंभीर
| नेरळ | प्रतिनिधी |
सध्या शाळा प्रवेशाचा हंगाम सुरू असून, रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अनास्थेमुळे अनेकांना जन्माचे दाखले मिळेनासे झाले आहेत. जन्माचे दाखले मिळत नसल्याने अनेक बालकांचे शाळा प्रवेश रोखले गेले असून, जिल्हा परिषदेच्या उदासीन कारभारामुळे अनेक बालके शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, शासनाच्या जन्म मृत्य नोंदी करणाऱ्या पोर्टलमुळे अनेक बालकांचे शाळा प्रवेशाचे स्वप्न भंग होण्याची शक्यता असून, शाळा प्रवेश देखील संकटात आले आहेत.
शासनाने 2020 रोजी जन्माला आलेल्या बाळांना त्याच ठिकाणी जन्माचा दाखला ऑनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरी जन्म झाला असेल, तर ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि महापालिका त्यांना जन्माचा दाखला देऊ शकते. मात्र, एखाद्या सरकारी दवाखान्यात त्या बाळाचा जन्म झाला असेल, तर मात्र त्या बालकाला त्याच सरकारी दवाखान्यातून जन्माचे दाखले देण्याचे नियोजन आहे. मागील सहा वर्षे होऊन देखील जन्म दाखला न मिळाल्यामुळे त्यांचे आधार कार्ड बनत नाही. त्यामुळे अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. या सर्व कार्य प्रणालीला जबाबदार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहरकर यांचेकडे या प्रश्नावर कोणतेही उत्तर नाही.
कर्जत तालुक्यातील राज्याच्या आरोग्य विभागाचे उपजिल्हा रुग्णालय कर्जत, ग्रामीण रुग्णालय कशेळे तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ, कळंब, खांडस, आंबिवली, कडाव, मोहिली या प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्मलेल्या बाळाच्या नोंदी 2021 पासून सुरू आहेत. मात्र, या जन्म नोंदी ऑनलाइन पोर्टलवर नसल्यामुळे मुलांना त्या मिळत नाही, शिक्षणाचे भविष्य असल्याचे दिसून येत आहे. जन्म नोंदी न मिळाल्यामुळे त्या बालकांचे आधार कार्ड बनवणे शक्य होत नाही. आधार कार्ड नसल्यामुळे मुलांना अंगणवाडीमध्ये त्यांची नोंद केली जात नाही. दरम्यान, शेकडो बालकांना जन्म दाखले न मिळाल्यामुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
