धक्कादायक! पोलादपूरमधील 64 बालकांना दिड वर्षे जीवनसत्वाची प्रतीक्षा
पोलादपूर शहरातील 1 ते 6 वयोगटातील 64 बालकांचे डोस थांबविले
कोरोनाच्या तिसर्या लाटेसाठी आरोग्य व्यवस्थेची लज्जास्पद सज्जता
। पोलादपूर । शैलेश पालकर ।
देशातील कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सर्वत्र जाहिर झाले असताना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाने कोरोनाच्या तिसर्या लाटेसाठी आगळीवेगळी आरोग्य व्यवस्थेची सज्जता केली आहे. पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वत्र 1 ते 6 वयोगटातील बालकांचे डोस व लसीकरण वेळेवर होत असताना केवळ पोलादपूर शहरातील 263 पैकी 64 बालकांना सहा महिन्यांनी द्यायचे डोस गेल्या 19 महिन्यांमध्ये टाळले गेले आहे. पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाची बालकांप्रती निष्ठूरता नेहमीच चर्चेत आली असूनही येथील कारभार सुधारण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचे दिसून येत आहे.
पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात आशासेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सर्वत्र 1 ते 6 वयोगटातील बालकांचे डोस व लसीकरण वेळेवर होत आहे. मात्र, पोलादपूर शहरात काही पालक स्वत:च्या बालकाच्या आरोग्याबाबत सतर्क असूनही त्यांना गेल्या दीड दोन वर्षांमध्ये पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये जीवनसत्व अ2 चा डोस उपलब्ध नसल्याचे सांगून परत पाठविले जात होते.
यानंतर अंगणवाडी सेविका आणि आशासेविका यांच्या मार्फत डोस उपलब्ध झाल्यावर कळविण्यात येईल, असे सांगण्यात आल्याने पालकांनी वेळोवेळी अंगणवाडी सेविका आणि आशासेविकांकडे डोसबाबत चौकशी केली. मात्र, दीड वर्षांच्या बालकांना जीवनसत्व अ 2 चा डोस झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर 2 वर्षांचे बालक झाल्यावर जीवनसत्व अ 3 चा डोस व त्यानंतर अडीचवर्षांच्या बालकांना जीवनसत्व अ 4 चा डोस तसेच 3 वर्षांच्या बालकांना जीवनसत्व अ 5 चा डोस देण्याचा निर्धारित कार्यक्रम एका आरोग्यपत्रिकेवर छापील स्वरूपात निश्चित करून 5 वर्षांपर्यंतचा कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. या निर्धारित कार्यक्रमाचा बोजवारा कोरोना संसर्ग काळात पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाच्या अनागोंदी कारभार करणार्या आरोग्य प्रशासनाने उडविला असून 106 मुली आणि 157 मुले अशी 1 ते 6 वयोगटातील 263 बालकांपैकी 24 मुली आणि 36 मुले अशा 64 बालकांना हे जीवनसत्वाचे डोस देण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीनी सदरची बाब पोलादपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गुलाबराव सोनावणे यांच्या निदर्शनास आणली असता त्यांनी अशी शक्यता नसल्याचे सांगून कोणी बालक डोस घेण्याचे बाकी असल्यास पालकांना बालकांसह शुक्रवारी डोस घेण्यास पाठविण्यास सांगितले. मात्र, या संदर्भात अधिक तपास करता अंगणवाडी सेविका आणि आशासेविकांनी जीवनसत्व अ2 हा डोस नसल्यामुळे गेल्या 19 महिन्यांमध्ये त्यापुढील जीवनसत्वांचे डोस देण्याचे टाळण्यात आले असल्याची माहिती दिली.
यासंदर्भात कागदोपत्री आकडेवारीवर नियंत्रण ठेवणार्या महिला व बालकल्याण विभागाने पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे डोस व लसीकरणाचे काम निर्धारित आरोग्य पत्रिकेनुसार होत असून पोलादपूर शहरामध्येच अशा प्रकारचा घोळ झाला असल्याचा निर्वाळा दिला.
यावेळी आकडेवारी व कार्यक्रम राबविणार्या महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभाग असे दोन भिन्न विभाग असल्याने पोलादपूर शहरामध्ये यात समन्वय नसल्याने 64 बालकांना गेल्या 19महिन्यांत त्यांचे जीवनसत्व अ 2, अ3, अ4 आणि अ 5 हे डोस देण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. पोलादपूर शहरातील सतर्क पालक मुश्ताक मुजावर यांनी त्यांच्या बालकास जीवनसत्व अ 2चा डोस नोव्हेंबर 2019 मध्ये दिल्यानंतर सहा महिन्यांनी जीवनसत्व अ 3चा डोस देण्यासाठी गेल्यावर्षी मे 2020 पासून पाठपुरावा केला असता जीवनसत्व अ 3चा डोस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याने हा प्रकार तब्बल 19 महिन्यानंतर उघडकीस आला आहे.
कोरोना संसर्गाची तिसरी लाट बालकांना धोकादायक असल्याचे सर्वत्र इशारे देऊन तिसर्या लाटेला सामोरे जाण्याची पूर्वतयारी केली जात असताना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाने तब्बल 64 बालकांच्या आरोग्याशी व जीवाशी खेळ खेळत तिसर्या लाटेला सामोरे जाण्यासाठी अतिशय क्रूरतापूर्वक पूर्वतयारी केल्याचे दिसून येत आहे.