रायगडमधील तीन निराधार बालकांना दत्तक प्रक्रियेतून हक्काचे कुटुंब
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील तीन निराधार बालकांना मायेचा आधार मिळाला आहे. महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या दत्तक प्रक्रियेमुळे या बालकांना हक्काचे कुटुंब मिळाले आहे.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील दत्तक प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार रायगड जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत दत्तक प्रक्रियेला गती दिली आहे. दत्तक ग्रहण नियमावली, 2022 अंतर्गत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा बाल संरक्षण समिती, रायगड किशन जावळ यांच्या परवानगीने जिल्ह्यातील तीन दत्तक प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये दोन संस्थात्मक दत्तक प्रकरणे असून, संस्थेतील बालकांना कायदेशीररित्या कायमस्वरूपी कुटुंब उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच एक नात्यांतर्गत दत्तक प्रकरण मंजूर करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे तीन बालकांना सुरक्षित, प्रेमळ व कायमस्वरूपी कुटुंबाचा आधार मिळाला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संबंधित विशेष दत्तक संस्था तसेच केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण यांच्या समन्वयातून या ऑनलाईन प्रणालीद्वारे पारदर्शक आणि नियमानुसार पूर्ण करण्यात आली.
दत्तक प्रक्रियेला अधिक गती देणार
प्रत्येक निराधार बालकाला सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंब मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, दत्तक प्रक्रियेला अधिक गती दिली जाईल. दत्तक प्रक्रिया ही निराधार बालकांच्या पुनर्वसनासाठी अत्यंत महत्त्वाची असून, समाजातील पात्र व इच्छुक दाम्पत्यांनी शासनाच्या अधिकृत प्रक्रियेद्वारे दत्तक घेण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे. इच्छुक दाम्पत्यांनी अधिकृत दत्तक प्रक्रियेसाठी नोंदणी करावी. पात्र व इच्छुक दाम्पत्यांनी अधिकृत दत्तक प्रक्रियेचा अवलंब करून निराधार बालकांना प्रेमळ व सुरक्षित कुटुंबाचा आधार द्यावा, असे आवाहन महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.
