| खरोशी | वार्ताहर |
पेण शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमतीबाई वि. देव विद्यालयामार्फत मराठी दिनाचे औचित्य साधून ‘बालसभेचे’ आयोजन विद्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (दि.27) करण्यात आले होते. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या बालसभेत इयत्ता सहावीचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
बालसभेचे उदघाटन, प्रमुख अतिथीपद व अध्यक्षस्थान प्रशालेतील शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांनीच भूषविले होते. ईशस्तवन व स्वागतगीताच्या सुमधुर स्वरांच्या साथीने, सरस्वतीपूजन, प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून बालसभेला प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी आपल्या मधुर व ओघवत्या भाषेतून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, नरवीर तानाजी मालुसरे, स्वामिनिष्ठ बाजीप्रभू देशपांडे, मराठी राजभाषा गौरव दिन, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, डॉ. सी.व्ही. रामन यांच्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. तसेच, स्फूर्तीगीते, पोवाडे, समूहगीतांचे गायन करून कार्यक्रमाची गोडी वाढविली.
शिवराज्याभिषेक सोहळ्याला यावर्षी 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण शिवसृष्टीचे अप्रतिम व देखणे सादरीकरण करून शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडून दाखवला व थोरांची वाहवा मिळविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रवण ठाकूर व काव्या नागांवकर या विद्यार्थ्यांनी केले. आभारप्रदर्शन मूर्धन्या पाटील हिने केले. बालसभेला मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे मुख्याध्यापक संदिप भोर, वर्गशिक्षिका उज्वला पाटील, विशाखा पाटील, प्रतिक्षा पाटील, वैष्णवी पाटील, रसिका पाटील, शुभांगी टेमघरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
पेण शिक्षण महिला समिती या संस्थेच्या अध्यक्षा सुहासिनी देव, उपाध्यक्षा मेधा देवधर, संस्था कार्यकारिणी सदस्या सुजाता तावरे, अंजली साठे, संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व अनेक मान्यवरांनी बालसभेतील कलाकारांचे भरभरून कौतुक करून शाबासकी दिली. कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने झाली.