श्रीकृपा इंग्लिश मीडियम स्कूल रेवदंडाचे स्नेहसंमेलन उत्साहात
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील श्रीकृपा इंग्लिश मीडियम स्कूल, रेवदंडाचे वार्षिक स्नेहसंमेलन येथील हरेश्वर मंदिराच्या प्रांगणात शुक्रवारी (दि. 27) जल्लोषात पार पडले. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करुन उपस्थितांची मने जिंकत उत्स्फूर्त दाद मिळविली. आपल्या पाल्याची थिरकणारी पावले पाहताच उपस्थित पालकही भारावून गेल्याचे दिसून आले.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रेवदंडा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल्ल मोरे, दुष्यंत झावरे उपस्थित होते. यावेळी स्कूल कमिटी सभासद आशा शेळके, स्वरुपा मानकर, शैलेश मानकर यांच्यासह स्कूलच्या मुख्याध्यापक रिया झावरे उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन व गणेशपूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. दरम्यान, मान्यवरांचा स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर केले. तसेच कोळीनृत्य, पारंपरिक सण उत्सव आदी विषयांसह विविध कलाविष्कारांचे कार्यक्रम सादर करुन उत्स्फूर्त दाद पटकाविली.

याप्रसंगी शैक्षणिक वर्षात अभ्यास, कला व क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळविणार्या विद्यार्थ्यांना स्मृतचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी गधानी आणि सुनील शेळके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकिता नाईक, निधी गुप्ता, अक्षता घरत, भाग्यश्री टेकाळकर, प्रीती म्हात्रे या शिक्षिकांसह शिक्षकेतर कर्मचारी संगिता गोंधळी, संपदा मानकर यांनी मेहतन घेतली. त्यांचाही मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
दरम्यान, मुख्याध्यापिका रिया झावरे यांनी स्कूलच्या कार्याचा आढावा घेतला व पालकांशी संवाद साधला. या स्कूलच्या माध्यमातून प्ले ग्रुप ते सिनिअर केजीपर्यंतच्या मुलांना शिक्षण देण्याचे काम अविरत सुरू असल्याचे त्या म्हणाल्या.आपला भारत देश अनेक कलगुणांनी बहरलेला आहे. आपली भारतीय संस्कृती आजही स्पर्धात्मक युगातही टिकून आहे आणि जोपासली जात आहे. याच भारतीय संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडावे, मुलांनी भारतीय संस्कृतीचे जतन करावे, या उदात्त हेतूने स्नेहसंमेलनाचे आयोजन केल्याचे सौ. झावरे म्हणाल्या.
पालकांकडून मुख्याध्यापकांचे कौतुक
श्रीकृपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्ले ग्रुप ते सिनिअर केजीपर्यंतच्या मुलांना शिक्षण दिले जाते. विविध प्रकारचे डे, सण-उत्सव राबवून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे यथार्थ दर्शन स्कूलच्या माध्यमामतून घडविले जाते. नवनवीन उपक्रम राबवून मुलांना शाळेविषयी आवड निर्माण करण्याचे काम केले जाते. म्हणूनच शाळेचे वेगळेपण इतर शाळांच्या मनाने ठासून दिसून येते. प्रत्येक मुलाच्या अभ्यासाकडे, खाण्या-पिण्याकडे शिक्षकांचे बारीक लक्ष असते. श्रीकृपा स्कूल म्हणजे हसतमुख, संस्कारपूर्ण शिक्षणाची शिदोरीच असून, हे सर्व मुख्याध्यापक रिया झावरे आणि सहकारी शिक्षिकांमुळे शक्य झाल्याचे उपस्थित पालकांनी बोलून दाखवले.
आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना चिमुकल्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्याचे काम श्रीकृपा इंग्लिश मीडियम स्कूल करत आहे. शिक्षण देतानाच या मुलांनी भविष्यात विविध कलाक्षेत्रात जावे, या उद्देशाने त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम अशा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. ही स्कूल मुलांना सर्वांगीण विकासाचे सुसंस्कारित शिक्षण देत आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
– अॅड. मनिषा नागावकर-लोहार, पालक
प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की, आपल्या मुलाला/मुलीला उत्तम प्रकारे इंग्रजी लिहिता, वाचता यावे. परंतु, सर्वांची मोठ्या शाळांमध्ये टाकण्याची ऐपत नसते. समाजातील तळागाळातील अशा घटकांचा विचार करुन शाळा सुरु करुन त्या पालकांचे स्वप्न सत्यात उतरविण्याचे काम श्रीकृपा इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून सुरू आहे. पालकांचाही चांगला प्रतिसादत मिळत असून, हाच विश्वास यापुढेसुद्धा राहील, याची खात्री वाटते.
– रिया प्रशांत झावरे, मुख्याध्यापक,
श्रीकृपा इंग्लिश मीडियम स्कूल, रेवदंडा





