नवीन पुलाचे काम युद्धपातळीवर करावे- माजी आ. सुरेश लाड
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहराचे दोन्ही भाग जोडणार्या उल्हास नदीवरील श्रीराम पूल येथे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. त्या वाहतूक कोंडीतून कर्जत शहरातील नागरिकांची सुटका व्हावी म्हणून जुन्या पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधला जात आहे. मात्र, दीड वर्षाचा कालावधी लोटला तरी पुलाचे काम पूर्ण होता नाही आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. दरम्यान, त्या अनेक महिने काम बंद असलेल्या पुलाचे काम जलदगतीने व्हावे, अशी मागणी माजी आमदार सुरेश लाड यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुलाच्या रखडलेल्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी श्री. लाड यांनी केली आहे.
कर्जत शहरातून जाणार्या उल्हास नदीवर 1960 मध्ये मुरबाड रस्त्याची निर्मिती झाली त्यावेळी पूल बांधण्यात आला होता. आमराई परिसरात बांधण्यात आलेल्या पुलाला श्रीराम पूल असे नामकरण करण्यात आले आहे. या पुलावरून एकावेळी दोन्ही बाजूला जाणार्या गाड्यांची संख्या एक अशी असल्याने या पुलाच्या परिसरात वाहतूक कोंडी ही नित्याची बनली आहे. त्याचा परिणाम या पुलाच्या दोन्ही बाजूला वाहतूक पोलीस उभे करण्याची वेळ पोलीस प्रशासनाला आली असून कायम त्या ठिकाणी वाहतूक कोंडी वाहनांच्या गर्दीमुळे होत असते. नेहमी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन विद्यमान आ. महेंद्र थोरवे यांनी 2023 मध्ये श्रीराम पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यासाठी निधी मंजूर केला. साधारण आठ कोटी रुपये या पुलाच्या निर्मितीसाठी मंजूर करण्यात आले आहे. दीड वर्षांपासून या पुलाच्या कामास सुरुवात झाली असून, या पुलाच्या निर्मितीमुळे श्रीराम पुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
मात्र, गेल्या पाच महिन्यात महिन्यात नवीन पुलाचे काम पूर्णपणे बंद असून या नवीन पुलाचे सहा खांब नदीमध्ये उभे राहिले असून, अन्य भागातील पुलाचे काम अद्याप बाकी आहे. जून महिन्यात पावसाळा सुरु झाल्यानंतर जे बांधकाम बंद झाले ते आजपर्यंत बंदच आहे. दुसरीकडे पुलाचे काम बंद असल्याने आणि पावसाळा संपून दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी पुलाचे काम सुरु होत नसल्याने माजी आमदार सुरेश लाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.