| अलिबाग | प्रतिनिधी |
मराठी बालनाट्य दिनानिमित्त बालकलाकारांना व्यासपीठ मिळावे, मुलांना मराठी मातृभाषा चांगल्या पद्धतीने वाचता यावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने खास बालनाट्य अभिवाचनाचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळ अंतर्गत ग्रामीण रंगभूमी तर्फे ‘अभिवाचन कट्टा’ हा उपक्रम शनिवारी (दि.2) पीएनपीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात राबविण्यात आला.
पीएनपी कलाविकास मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील आणि चित्रपट दिग्दर्शक, संगीतकार विक्रांत वार्डे यांच्या संकल्पनेतून आणि ग्रामीण रंगभूमीचे अध्यक्ष राजन पांचाळ यांच्या मार्गदर्शनातून पीएनपी कलाविकास मंडळ अंतर्गत ग्रामीण रंगभूमीच्या माध्यमातून कला क्षेत्रात विविध उपक्रम चांगल्या पद्धतीने राबविले जात आहेत. त्यामुळे स्थानिक कलाकारांना कला सादर करण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी अभिवाचन कट्टा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमादरम्यान, चौल मोरया क्रिएशन प्रस्तुत ‘गणपती बाप्पा मोरया’ या नाटकाचे अनन्या प्रभाळे, आदीत्य आठवले, गणेश प्रभाळे, प्रकाश कवळे, निलेश वर्तक आणि नव्या वर्तक यांनी वाचन केले. पेझारी अनंत थिएटर प्रस्तुत ‘जीर्णोद्धार’ या नाटकाचे आराध्य पाटील, रिद्धी पिंगळे, स्वराज काकडे, आदीत्य म्हात्रे, श्रावणी सुतार आणि तनिष्का पाटील या बालकलाकारांनी वाचन केले. दोन बालनाटकांमधील निवडक प्रवेशांचे प्रभावी अभिवाचन करण्यात आले. यावेळी मुंबई येथील सीबीआयचे सहाय्यक पोलीस आयुक्त भारत दिघे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात अलिबागमधील रंगकर्मी राजन पांचाळ, सागर नार्वेकर, किशोर म्हात्रे, संतोष बोंद्रे, योगेश पवार, सुचित पाटील, मंगेश सुतार यांनी उपस्थित पालक आणि बालकलाकारांना मार्गदर्शन केले. तसेच, विक्रांत वार्डे यांनी मार्गदर्शन करताना सादर झालेली दोनही बालनाट्य पीएनपी कलाविकास मंडळाच्यावतीने अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाच्या रंगमंचावर सादर करण्यात येतील, असे जाहीर केले.
बालकलाकारांना संधी
मोबाईलमध्ये रमणाऱ्या पिढीला कलेच्या माध्यमातून उभारी देण्याचा प्रयत्न ‘अभिवाचन कट्टा' या उपक्रमातून देण्यात आला. अलिबाग पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळ अंतर्गत ग्रामीण रंगभूमी तर्फे अभिवाचन कट्टा उपक्रम राबविण्यात आला. लहान मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याबरोबरच पीएनपी नाट्य गृहाच्या माध्यमातून त्यांना हक्काचे व्यासपिठ देण्याची संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या बद्दल पालक आणि कलाकारांकडून आणि विविध क्षेत्रातून शुभेच्छा देण्यात आल्या.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हौशी नाट्य मंडळ आणि कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना रंगमंच उपलब्ध करणे, त्यांना शिबिराच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन कलाकार घडवणे या उद्देशाने पीएनपी कलाविकास मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील, चित्रपट दिग्दर्शक व संगीतकार विक्रांत वार्डे आणि मी ग्रामीण रंगभूमीची स्थापना केली. त्याचाच एक भाग म्हणजे ‘अभिवाचन कट्टा’ हा उपक्रम आहे. ग्रामीण रंगभूमीच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील कलाकारांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे. चित्रलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाने ग्रामीण रंगभूमीचे पदाधिकारी, ग्रामीण रंगभूमी आणि कलाकार सशक्त करणार, असा विश्वास आहे.
राजन पांचाळ,
अध्यक्ष, ग्रामीण रंगभूमी






