। सोगांव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा सोगांव येथे शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत बाल मेळाव्याचे आयोजन मंगळवारी (दि.19) करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरी काढून करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, पालकवर्ग, मुख्याध्यापिका, शिक्षक, उर्दु अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, मान्यवर व ग्रामस्थ उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी स्कुल की शान हम बच्चे, स्कुल की जान हम बच्चे, अश्या उत्साहित घोषणा दिल्या. त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित जमातुल मुस्लिमीन ट्रस्ट अध्यक्ष वस्सीम कुर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समद कुर यांच्याहस्ते मेळाव्याचे मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले.
पहिलीत दाखल होणार्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते चॉकलेट व बिस्किटे देऊन स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या पालकांचे मुख्याध्यापिका फरजाना कुर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले तर उर्दु अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी माजी मापगांव ग्रामपंचायत सदस्य स्मिता राऊत, नाईक, कडवे आदी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
बालमेळावा अभियानातून बौद्धिक विकास, शारीरिक विकास, सामाजिक व भावनिक विकास, भाषा विकास, गणन पूर्व तय्यारी याबाबत स्टॉलद्वारे आठवी ते दहावीच्या शिक्षकप्रेमी विद्यार्थ्यांनी पहिलीत दाखल होणार्या मुलांना व त्यांच्या पालकांना उर्दु अंगणवाडी सेविका रिजवाना मुल्ला व सहाय्यक शिक्षिका शेख अम्मारा यांच्या साहाय्याने अनमोल मार्गदर्शन केले. या शैक्षणिक अभियानाचे उपस्थित पालकांनी व मान्यवरांनी कौतुक करत सर्व शिक्षकवर्गाचे आभार मानले.
सोगांव उर्दू शाळेत बाल मेळावा
