। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गोरखपूरहून मुंबईला आलेल्या कुशीनगर एक्सप्रेसच्या शौचालयामधील कचऱ्याच्या डब्यात सहा वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच जीआरपी आणि क्राईम ब्रान्चची पथके घटनास्थळी दाखल झाली. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शनिवारी (दि. 23) रात्री 1:05 वाजता कुशीनगर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पोहोचली होती. हीच ट्रेन नंतर ‘काशी एक्सप्रेस’ (15017) बनून पुढे रवाना होते. ट्रेनच्या साफसफाईदरम्यान स्वच्छता निरीक्षकाची नजर एसी कोच बी 2 मधील शौचालयामध्ये पडली आणि तिथे कचरापेटीमध्ये त्या चिमुकल्याचा मृतदेह दिसला. या घटनेची माहिती तात्काळ स्टेशन व्यवस्थापकांना देण्यात आली. यानंतर रेल्वे प्रशासन आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला.
मिळालेल्या माहितीनुसार, या मृत मुलाच्या आईने गुरुवारी (दि. 21) आपल्या चुलत भावाविरोधात अपहरणाचा गुन्हा सुरत ग्रामीणच्या अमरोली पोलीस ठाण्यात दाखल केला होता. विकास शाह (25) असे या चुलत भावाचे नाव आहे.
त्यामुळे या हत्या प्रकरणात भाऊ संशयित आहे. त्याने प्रथम सुरत येथून मुलाचे अपहरण केले, नंतर मुलाला घेऊन नाशिकला पोहोचला. नाशिकहून मुंबईला येण्यासाठी त्याने कुशीनगर एक्सप्रेस पकडली. पोलिसांना संशय आहे की आरोपीने पीडित मुलाची ट्रेनमध्येच हत्या केली आणि एसी कोचच्या शौचालयाच्या कचऱ्याच्या डब्यात मृतदेह लपवून पळून गेला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
खळबळजनक! एक्सप्रेसमधील शौचालयात आढळला चिमुकल्याचा मृतदेह
