। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागातील निवी आदिवासीवाडी येथे घराच्या पडवीचा पील्हर अंगावर पडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवार, दि.23 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची खबर इंदिरा नथुराम वाघमारे (30) रा. निवी आदिवासीवाडी, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील फिर्यादी इंदिरा वाघमारे यांचा मुलगा अश्विन वाघमारे (6) रा. निवी आदिवासीवाडी हा त्यांच्याच गावातील एका पडीक घराजवळ खेळत असताना त्याच्या अंगावर सदर घराच्या पडवीचा पील्हर पडून त्यास लहान-मोठ्या स्वरूपाच्या जखमा होऊन त्याच्या नाकातून व कानातून रक्त येऊन त्यात तो मयत झाला. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. दोडकुलकर हे करीत आहेत.