सुरक्षा यंत्रणेत उडाली खळबळ
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
जिल्हयातील गिर्ये गावाजवळच्या समुद्रात चायनीज व्हीटीएस यंत्रणा असलेली बोट सापडली आहे. ही बोट रत्नागिरी येथील असल्याचे निष्पन्न झाले असून तिला पुढील तपास व कारवाईसाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
देवगड समुद्रात चीनी बोटी असल्याचे लोकेशन कोस्टगार्डला जीपीएस यंत्रणेवर मिळाले. गेले दोन ते तीन दिवस या नौका देवगड समुद्रात असल्याचे समजल्यानंतर तत्काळ याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. सागरी पोलीस विभागाने गस्ती नौकेने शोधमोहीम राबविल्यानंतर गिर्ये गावाजवळच्या समुद्रात चायनीज व्हीटीएस यंत्रणा असलेली बोट सापडली. दाऊद इब्राहीम साखरकर यांची ही बोट असून ही नौका यांत्रिकी मच्छिमारी नौका आहे.
या नौकेवर बसविण्यात आलेल्या चीनी कंपनीची व्हीटीएस यंत्रणेचे भारतीय नोंदणीकरण करण्यात न आल्याने ही नौका चीनमधील असल्याचे जीपीएस यंत्रणेवर दिसत होते. यामुळे सुरक्षा यंत्रणेमध्ये खळबळ उडाली व यंत्रणा संशयित चीनी बोटींचा शोध घेण्याच्या कामाला लागली. दरम्यान, ही नौका भारतीय असल्याचे निष्पन्न झाल्याने सुरक्षा यंत्रणेनेही सुटकेचा निश्वास सोडला आहे. नौका मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात दिल्यानंतर तपासणीअंती नौकेवर पर्सनेट जाळी आढळल्याने खळबळ उडाली. तसेच नौकेवर जनरेटर, 10 पेक्षा जास्त कर्मचारी, जाळ्यांची लांबी – रुंदी नियमबाह्य असल्याचे आढळल्याने मत्स्यव्यवसाय विभाग त्यादृष्टिने तपासणी करून पुढील कारवाई करणार आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर यांनी दिली.