बिंदिता पाटील यांच्यावर कारवाई करा; शेकाप सदस्या देवयानी पाटील यांची मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चिंचोटी ग्रामपंचायतीच्या सरपंचाने कामे न करताच बिले काढून भ्रष्टाचार केल्याचा दावा शेकापच्या सदस्या देवयानी पाटील यांनी केला आहे. याबाबतचे सर्व पुरावे त्यांच्या हाती असून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणार्या सरपंच बिंदिता बाबुराव पाटील यांची पदावरुन हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणी शेकापच्या सदस्यांनीही आक्रमक भुमिका घेत जनतेचा पैसा लुटणार्या सरपंचाला त्याची जागा दाखवून देण्याचा निर्धार केला आहे.
काँग्रेसच्या सरपंच बिंदिता पाटील यांनी 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपकेंद येथील गटार बांधण्यासाठी 1 लाख 40 हजार 874 रुपयांचा निधी खर्च केला. याबाबत रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याने काम पूर्ण झाल्याचा दाखलाही ग्रामपंचायतीला दिला. मात्र प्रत्यक्षात असे कोणतेही गटार बांधण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गैरव्यवहारात बांधकाम विभागाचे प्रशासकिय अधिकारीही सामील असून केवळ आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी त्यांनी हा दाखला दिला असल्याचा आरोप देवयानी पाटील यांनी केला आहे.
याशिवाय ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक शौचालय व नळ दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडून 1 लाख 88 हजार रुपये खर्च केले असल्याचे ग्रामसेवक जयश्री धुमाळ यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात शौचालयांची दुरुस्ती अथवा नळ कनेक्शन केले नसल्याचे समोर आले आहे.
सरपंच बिंदिता पाटील यांनी पदाचा गैरवापर करीत शासनाची तसेच जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेकापच्या देवयानी पाटील यांनी केली आहे.
गटविकास अधिकार्यांना निवेदन
चिंचोटीच्या सरपंच बिंदिता पाटील यांनी लाखो रुपयांचा अपहार केला आहे. कामे न करताच बिले काढून पैशांचा अपहार केला आहे. त्यांनी शासनाची तसेच जनतेचीही फसवणूक केली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देवयानी पाटील यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अलिबाग यांच्याकडे केली आहे.
बेबन कन्स्ट्रक्शनच्या नावाने काढले बिल
15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपकेंद येथील गटार बांधण्याचे काम बेबन कन्स्ट्रक्शनकडे काम देण्यात आले होते. तर ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक शौचालय व नळ दुरुस्तीचे काम प्रितम भगत यांना दिल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली. त्यामुळे या भ्रष्टाचारात ठेकेदारानेही आर्थिक हितसंबंध जोपासल्याचे समोर आले आहे.