चिंचोटी ग्रामस्थांचा गेल कंपनीवर मोर्चा

ग्रामस्थांवर पोलिसांचा लाठीचार्ज

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

गेल कंपनीमध्ये कामावर असलेल्या एका परप्रांतीय कामगाराकडून चिंचोटी परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा घृणास्पद प्रकार घडल्याने या परिसरातील वातावरण तंग झाले. याच मुद्यावर चिंचोटी ग्रामस्थांनी शनिवारी (दि.18) गेल कंपनीवर मोर्चा काढून ग्रामस्थांनी घटनेचा निषेध व्यक्त केला. जवळपास 400 ते 500 ग्रामस्थांनी मोर्चा काढून पोलिसांनी केलेला लाठीचार्ज, परप्रांतियांमुळे गावातील महिलांची असुरक्षितता याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी चिंचोटी ग्रामपंचायतीच्या सदस्या देवयानी पाटील, संजय पाटील, ग्रामस्थ तसेच शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या घटनेनंतर गेल प्रशासनाने मात्र सकारात्मक चर्चा केली.


चिंचोटी गावच्या रस्त्यावर एका अल्पवयीन मुलीवर गेल कंपनीत कामावर असलेल्या  परप्रांतीय तरुणांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. सुदैवाने वेळीच तिने आरडाओरडा केला आणि गावकरी घटनास्थळी पोहचले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. संतप्त गावकर्‍यांनी त्यातील एका आरोपीला चांगलाच चोप दिला. यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी शनिवारी सायंकाळी कंपनी गेटवर मोर्चा काढला. तसेच पोलिसांना चांगलेच धारेवर धरले.
 
नेमकं काय झालं?
वावे येथून एक अल्पवयीन मुलगी चिंचोटी येथे आपल्या गावी चालत जात होती. ती ज्या रस्त्याने जात होती, त्या मार्गावर निर्जन ठिकाणी आरोपींनी तिला रस्त्याच्या बाजूला शेतात ओढत नेले. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला म्हणून ओढणीने तिचा गळा दाबण्याचा देखील प्रयत्न केला. सुदैवाने या मार्गावरून एक वाहन गेले. त्याच्या प्रकाशाने घाबरून दोघे पळाले. त्या मुलीने आरडाओरडा केल्याने काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला पकडले. गावातील मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या त्या तरुणाला संतप्त जमावाने चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे चिंचोटी आणि पंचक्रोशीतील गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमाव प्रचंड संतापला होता. गेल कंपनीच्या ज्या कंत्राटी  ठेकेदाराकडे परप्रांतीय असलेला आरोपी काम करतो. या ठेकेदाराला बोलवा, त्याशिवाय आरोपीला घेऊन जाऊ नये, असा पवित्रा गावकर्‍यांनी घेतला. वातावरण चांगलेच तापले होते. पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी घटनास्थळी भेट दिली.


लाठीचार्जवर गावकरी नाराज
या घटनेची खबर सर्वत्र पसरली आणि गावकरी घटनास्थळी धावले. वातावरण चांगलेच तापले होते. गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्या परप्रांतीय तरुणाच्या ठेकेदार मालकाला बोलवा, ही एकच मागणी होती. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे गावकर्‍यांनी कृषीवलसोबत बोलताना सांगितले. या लाठीचार्जमध्ये पीडित मुलीच्या वडिलांना देखील मार बसला. चिंचोटी येथील ही घटना रात्री 8 च्या सुमारास घडली. पहाटे साडेचारच्या सुमारस आरोपीवर गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात येते. रात्रभर या घटनेमुळे रेवदंडा पोलीस ठाण्यात गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परप्रांतीयांची माहिती कोणाकडे?
नोकरी आणि कामासाठी परजिल्ह्यातील कामगार अलिबाग तालुक्यातील गावागावात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. कंत्राटी पध्दतीवर मिळेल ते काम ते करतात. एकतर कामाच्या ठिकाणी झोपडी बांधून रहातात. नाहीतर गावात भाड्याच्या खोलीत रहातात. विशेष म्हणजे, त्यांच्या ओळखीचे किती दाखले, घरमालक तपासून घेतात? हा प्रश्‍न आहे. ठेकेदार देखील त्यांची शहानिशा करतात का? अशा मजुरांची माहिती ते गावातील ग्रामपंचायत, पोलीस पाटील, पोलीस ठाणे येथे देतात का? या सर्वांची चौकशी व्हावी, अशी मागणी मोर्चात ग्रामस्थांनी केली.

ग्रामस्थांनी कायद्याचे उल्लंघन करु नये. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गावात शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत. याबाबत सर्व ग्रामस्थांनी शांतातेत प्रकरण हाताळणे गरजेचे आहे.

देविदास मुपडे, पोलीस निरीक्षक, रेवदंडा पोलीस ठाणे

खानावचे सरपंच अनुपस्थित
गेल ही कंपनी खानाव ग्रामपंचायत हद्दीत असून कंपनीतील परप्रांतीय कामगाराने केलेला गुन्हा अतिशय निंदनीय होता. त्यामुळे कंपनीवर काढण्यात आलेल्या मोर्चात लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच अनंत गोंधळी यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामस्थांनी सरपंचांना बोलवा, तोपर्यंत चर्चा करणार नाही, अशी भूमिका घेतली. पोलिसांनी गोंधळी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सोयीस्कररित्या मुंबईत असल्याचा निरोप पोलिसांकडे दिला. त्यामुळे ग्रामस्थांनी निवडून दिलेल्या सरपंचांविरोधातही घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला.

परिसरात पोलीस चौकी उभारा
जोपर्यंत ग्रामस्थ, कंपनी प्रशासनाचे अधिकारी तसेच कंत्राटदार यांच्यात चर्चा होत नाही तोपर्यंत कंपनीचे काम बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच कंपनीच्या हद्दीत पोलीस चौकी उभारण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

Exit mobile version