सहा कोटींचे चिनी फटाके जप्त

जेएनपीए बंदरात मुंबई डीआरआय विभागाची कारवाई

| चिरनेर | प्रतिनिधी |

महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबईने सोमवारी न्हावा-शेवा बंदरातून 6.32 कोटी रुपये किमतीचे 20 मेट्रिक टन चिनी फटाके जप्त केले आहेत. विश्वसनीय खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केली. तस्करांनी पकडले जाऊ नये म्हणून लेगिंग्जच्या नावाची चुकीची घोषणा करून फटाक्यांची तस्करी केली होती. न्हावा-शेवा बंदरात आलेल्या कंटेनरची तपासणी करताना त्यांना लेगिंग्जऐवजी कंटेनरमध्ये 95 टक्के जागेत लपवून ठेवलेले चिनी मूळचे फटाके आढळून आले. 60,000 फटाक्यांच्या बॉक्समधून 20 मेट्रिक टन चिनी फटाके आढळून आले. या फटाक्यांची किंमत 6.32 कोटी रुपये आहे.

आयात करण्यात आलेले फटाके परदेशी व्यापार धोरणांतर्गत प्रतिबंधित आहेत. चिनी फटाके हानिकारक आहेत. कारण त्यात लाल शिसे, तांबे, ऑक्साईड आणि लिथियमसारखी प्रतिबंधित रसायने असतात. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षितता, बंदरातील पायाभूत सुविधांना मोठा धोका निर्माण होतो. यामुळे या फटाक्यांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही प्रतिबंधित फटाक्यांची तस्करी केली जात असल्याचे या प्रकरणातून उघडकीस आले आहे. याप्रकरणी डीआरआयचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version