चिपळूणचा गणेशोत्सव यंदा दीड दिवस

। चिपळूण । वार्ताहर ।
चिपळूण नगरीची शान असलेल्या व शासनाचे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व विभागीय स्तरावर सातत्याने पुरस्कार मिळविणाऱ्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,चिपळूणच्या वतीने दरवर्षी विविध स्पर्धा, प्रबोधनात्मक देखावे, करमणुकीचे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमांनी गणेशोत्सव साजरा होतो. यावर्षी चिपळूण येथे आलेला महापूर व कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने शासनाचे सर्व नियम पाळून दीड दिवसाचा साजरा होणार आहे.

यावर्षी मंडळाने खुल्या गटासाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.महापुरामुळे व गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अनेकांना या जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा असूनही भाग घेता आला नाही. ही बाब अनेक स्पर्धकांनी मंडळाच्या पदाधिकारी वर्गाच्या निदर्शनास आणून दिल्याने मंडळाने निबंध सादर करणेची मुदत 19 सप्टेंबर पर्यंत वाढविली आहे.

या निबंध स्पर्धेचे विषय 1)आपल्या जीवन शैलीचे पर्यावरणावर होणारे परिणाम व त्यावरील उपाययोजना,2)कोरोना संकट की संधी?3)वारंवार येणारे महापूर व त्यावरील उपाययोजना, हे असून यापैकी कुठल्याही एका विषयावर निबंध लिहावयाचा आहे.निबंधाच्या पहिल्या पानावर स्पर्धकाचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, व्यवसाय/नोकरी/विद्यार्थी/अन्य याचा उल्लेख करावा, तसेच आपले वय व मोबाईल क्रमांक याचा देखील उल्लेख करावा.सहभागी स्पर्धकांनी आपले निबंध श्री.प्रकाश काणे द्वारा आदर्श उपहार गृह, नगरपरिषद शेजारी, बाजारपेठ, मेन रोड, चिपळूण 415 605, जि.रत्नागिरी. मोबाईल नं. 8605181488 या पत्यावर पाठवावेत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मंडळाने केले आहे.

Exit mobile version