चिरनेर हुतात्मा स्मृतिदिन साधेपणाने साजरा

पोलिसांकडून हुतात्म्यांना शासकीय मानवंदना

चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील चिरनेर येथे ब्रिटिश राजवटीतील 1930च्या जंगल सत्याग्रहाच्या लढ्याचा 91वा हुतात्मा स्मृतीदिन शनिवारी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळत काही मोजक्याच मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा अभिवादन सोहळा पार पडला.
यावेळी नवी मुंबई पोलिसांच्या वतीने हुतात्मा स्मृती स्तंभासमोर बंदुकीच्या तीन फैरी झाडून व बिगूल वाजवून हुतात्म्यांच्या स्मृतींना शासकीय मानवंदना देण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. बाजूला असलेल्या हुतात्मा चौकातील हुतात्मा शिल्पचित्रांनाही मान्यवरांनी भेट देऊन पुष्पमाला अर्पण केली. हुतात्म्यांच्या व स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार मुख्य कार्यक्रमस्थळी न करता संबंधित नातेवाईकांच्या घरोघरी जाऊन चिरनेर ग्रामपंचायतीकडून करण्यात आला.
या हुतात्मा स्मृतीदिनाच्या शासकीय कार्यक्रमाचे आयोजन चिरनेर ग्रामपंचायत प्रशासन, उरण पंचायत समिती आणि राजिप अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी जि.प. सदस्य बाजीराव परदेशी, उरण पंचायत समितीच्या माजी सभापती शुभांगी पाटील, उद्योगपती पी.पी. खारपाटील, माजी आ. मनोहर भोईर, उद्योगपती राजेंद्र खारपाटील, जि.प. माजी सदस्य संतोष ठाकूर, शेकापचे सुरेश पाटील, चिरनेर तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, पोलीस पाटील संजय पाटील, ग्रामविकास अधिकारी महेश पवार यांच्यासह ग्रामपंचायतीचे माजी सदस्य माजी सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच मोजकेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version