। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील चिरनेर येथे हुतात्म्यांच्या शौर्य भूमीत ब्रिटिश राजवटीतील 25 सप्टेंबर 1930 च्या चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या लढ्याचा 94 वा हुतात्मा स्मृतीदिन अभिवादन सोहळा बुधवारी (दि.25) मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. ज्यांच्या बलिदानामुळे भारतीय स्वतंत्र्याची पहाट उगवली त्या हुतात्म्यांची स्मारके पुढील पिढीला दीपस्तंभासारखीच प्रेरणादायी ठरतील, असे प्रतिपादन कार्यक्रमादरम्यान माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केले.
पुढे बोलताना मा.आ. बाळाराम पाटील म्हणाले की, चिरनेर जंगल सत्याग्रहाचा इतिहास नव्या पिढीला वाचण्याच्या माध्यमातून किंवा अन्य तांत्रिक माध्यमातून समजून द्यायला हवा. यातून विद्यार्थ्यांच्या व जनतेच्या मनामध्ये हा जंगल सत्याग्रहाचा इतिहास ठसून राहिला पाहिजे. या रणसंग्रामाला आज 94 वर्ष पूर्ण होत आहेत. हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य चिरकाल टिकवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानची नक्कीच दखल घेऊन, नव्या पिढीला भावेल असेच काम आपल्याला करायचे आहे.
दरम्यान, पोलीस दलातर्फे हुतात्मा स्मृतीस्तंभासमोर हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून व बिगुल वाजवून हुतात्म्यांच्या स्मृतींना शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हुतात्मास्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. ‘हुतात्मे अमर रहे’च्या ललकारांनी हुतात्म्यांच्या शौर्यभूमीतील शौर्याचा इतिहास जागा झाला. प्रथेप्रमाणे हुतात्म्यांच्या व स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या अभिवादन सोहळ्याला विद्यमान खासदार, मा.आ. मनोहर भोईर, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, उद्योगपती पी.पी. खारपाटील, काँग्रेसचे महेंद्र घरत, पनवेलचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, राजेंद्र खारपाटील, नारायण घरत, संतोष ठाकूर, तहसीलदार उद्धव कदम, समीर वाठारकर, पोलीस निरीक्षकक्ष राजेंद्र मिसाळ, दिनेश पाटील, रवींद्र पाटील, भूषण पाटील, शुभांगी पाटील, सरपंच भास्कर मोकल, सचिन घबाडी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.