नाभिक समाजाला सहकार्य कायम राहिल- चित्रलेखा पाटील
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष नेहमी कष्टकरी, कामगार, शेतकरी वर्गाच्या पाठीशी कायमच राहिला आहे. गोरगरींबांंच्या न्याय हक्कासाठी लढणारा शेकाप हा एकमेव पक्ष आहे. हेअर कटींग मार्गदर्शन शिबीर व सेमिनार सारखे कार्यक्रम मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये घेतले जातात. त्याच धर्तीवर अलिबागमध्ये हा उपक्रम राबविल्याचा आनंद होत आहे. अलिबागमधून देखील चांगले कलाकार, व्यवसायिक घडले पाहिजे ही भुमिका असून नाभिक समाजाला कायमच सहकार्य राहिल, अशी ग्वाही शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी दिली आहे.
शेतकरी कामगार पक्ष जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील पुरस्कृत, श्रीसंत सेना महाराज नाभिक समाज संस्था अलिबागच्यावतीने आधुनिक हेअर कटींग मार्गदर्शन शिबीर व सेमिनारचे आयोजन सोमवारी (दि.23) मॅपल आयव्हीमध्ये करण्यात आले हाते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भारतातील सुप्रसिध्द हेअर डिझायनर उदय टक्के, सौंदर्य तज्ञ हर्षदा टक्के, श्रीसंत सेना महाराज नाभिक समाज संस्था अलिबागचे अध्यक्ष संजय शिंदे, महिला अध्यक्षा नंदिनी इंदूलकर, उपाध्यक्ष नितीन कदम, कार्याध्यक्ष संदीप कदम, सचिव संतोष इंदूलकर, खजिनदार समीर पवार आदी मान्यवरांसह समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भारतातील सुप्रसिध्द हेअर डिझायनर उदय टक्के व सौंदर्य तज्ञ हर्षदा टक्के यांनी प्रात्यक्षिकासहित मोलाचे मार्गदर्शन केले. या शिबिरात अलिबाग तालुक्यातील पोयनाड, रेवदंडा, चोंढी विभागातील तसेच श्रीवर्धन व अन्य तालुक्यातील दोनशेहून अधिक शिबिरार्थींनी सहभाग घेतला होतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी अध्यक्ष संतोष पवार, शेखर घाडगे, वैभव मुकादम, वैष्णवी मुकादम, विजया साळुंखे, अॅड. रश्मी पांडव, अमोद पांडव, प्रदिप जाधव, राजू जाधव, सुर्यकांत शिंदे, आत्माराम साळुंखे, संतोष मोरे, अभिजीत महाले, प्रमोद महाले, संतोष इंदूलकर, स्वप्नील शिंदे, नितेश निमुटकर आदींनी प्रचंड मेहनत घेतली.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील म्हणाल्या, मुंबई, पुणेसह अनेक मोठ्या शहरांमध्ये नवनवीन हेअर कटींग ब्युटीशिअन मेकअपचे शॉप आहेत. नवनवीन बदलामुळे या क्षेत्रातदेखील अमुलाग्र बदल होत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील मंडळीदेखील या क्षेत्रात चांगली प्रगती करीत आहेत. अलिबाग पर्यटनाच्या दृष्टीने नावारुपाला येत असताना अलिबागमधून चांगले कलाकार घडले पाहिजे. चांगले व्यवसायिक निर्माण झाले पाहिजे. अशा पद्धतीने अशा प्रकारचे सेमिनार व शिबीर घेणे गरजेचे आहे. या शिबिरातून तरुणांना एक चांगले हक्काचे व्यासपिठ मिळणार आहे. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुप्रसिध्द हेअर डिझायनर उदय टक्के व सौंदर्य तज्ञ हर्षदा टक्के मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. त्यांच्याकडून शिबीरार्थींना मेकअप हेअर डिझायनर बनण्याची मेजवानी त्यांच्या मार्गदर्शनातून नक्की मिळेल, असे प्रतिपादन चित्रलेखा पाटील यांनी केले.
चित्रलेखा पाटील यांचे आभार
शेतकरी कामगार पक्ष जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील पुरस्कृत, श्रीसंत सेना महाराज नाभिक समाज संस्था अलिबागच्यावतीने आधुनिक हेअर कटींग मार्गदर्शन शिबीर व सेमिनारच्या माध्यमातून अलिबागसह रायगड जिल्ह्यातील शिबीरार्थींना एक वेगळे व्यासपिठ मिळवून दिले. याबद्दल नाभिक समाजाच्यावतीने चित्रलेखा पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले.