चित्रलेखा पाटील यांनी केले नयन पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील पेझारी-आंबेपूर येथील नयन नंदकुमार पाटील या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. याघटनेची माहिती मिळताच शेकाप प्रवक्त्या, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी पेझारी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे खारेपाट विभागातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नयन नंदकुमार पाटील या तरुणाचे मंगळवारी (दि.9) अलिबाग-वडखळ मार्गावरील संजीवनी हॉस्पीटल समोर अपघाती निधन झाले. पेझारी येथील नंदकुमार पाटील, शिवभक्त जयकुमार पाटील यांच्या कुटुंबीयांची पेझारी येथील निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. तसेच स्व.नयन पाटील यांची पत्नी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते चंद्रकांत भास्कर पाटील यांची कन्या असल्याने त्यांच्या कुटुंबाची देखील चित्रलेखा पाटील यांनी सांत्वनपर भेट घेऊन विचारपूस केली.

नयन पाटील या तरुणाच्या अपघाती निधनाबद्दल बोलताना चित्रलेखा पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, अलिबाग-वडखळ या रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत. गेल्या वर्षभरामध्ये अनेक तरुणांचे अपघाती निधन वडखळ ते पोयनाड दरम्यान झाले असून अनेक तरुण किरकोळ जखमी झाले आहेत. या रस्त्यावर इस्पात कंपनीच्या अवजड वाहनांची वाहतूक,तसेच अन्य वाहनांच्या वर्दळ प्रचंड वाढली आहे. बेसुमार वाहने चालविली जात आहेत. त्यामुळेच हे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ, यांनी अपघाताची ठिकाणे दिशादर्शक फलक लावणे आवश्यक आहे. गतिरोधकाचेही फलक जागोजागी लावणे आवश्यक आहे. यासंदर्भामध्ये बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नयन पाटील हा पेझारी आंबेपूर गावातील होतकरू तरुण होता. तो त्यांच्या कुटुंबातील नंदकुमार पाटील यांचा एकुलता एक आधार होता. नयन यांच्या निधनाने त्यांच्या कुटूंबात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे दुःख चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केले.

Exit mobile version