चित्रलेखा पाटील यांनी केली उमटे धरणाची पाहणी

संघर्ष ग्रुपने चित्रलेखा पाटील आणि प्रशांत नाईक यांचे मानले आभार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

उमटे धरणातील गाळ कित्येक वर्ष काढण्यात आला नव्हता. त्यामुळे तालुक्यातील 44 गावातील नागरिकांना 33 वाड्यांना दुषीत पाण्याचा पुरवठा होत होता. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. तसेच, येथील पर्यटन व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होत असल्याने यातून मार्ग काढावा, अशी विनंती उमटे धरण संघर्ष ग्रुप तसेच धरण परिसरातील स्थानिकांनी शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा नृपाल पाटील (चिऊताई) व अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याकडे केली होती.

पिण्याच्या पाण्यासाठी पाठपुरावा घेत मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांची 29 एप्रिल रोजी चित्रलेखा पाटील यांनी भेट घेतली होती. नागरिकांना शुध्द पाणी द्या, शासनामार्फत धरणातील गाळ काढा अन्यथा आम्हाला तो गाळ काढण्यासाठी सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (सीएफटीआय) या आमच्या सामाजिक संस्थेला सीएसआर फंडातून गाळ काढण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. यावेळी चित्रलेखा पाटील, प्रशांत नाईक आणि उमटे धरण संघर्ष ग्रुप यांच्या मागणीला यश आले आणि 17 मे पासून गाळ काढण्यास सुरुवात झाली. या पूर्वी चित्रलेखा पाटील आणि प्रशांत नाईक यांनी दोन-तीन वेळा उमटे धरणाची पाहणी केली असून पुन्हा चित्रलेखा पाटील यांनी बुधवारी (दि.22) उमटे धरणाची पाहणी करत पावसाळ्या पूर्वी जास्तीत जास्त गाळ काढण्याचे प्रयत्न असल्याचे संगितले. याबद्दल उमटे धरण संघर्ष ग्रुपने चित्रलेखा पाटील आणि प्रशांत नाईक यांचे आभार मानले.

यावेळी बोलताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या, आजवर शेकापक्षाच्या माध्यमातून कायमचे तळागाळातील प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दिलेला शब्द पूर्ण सुद्धा केला आहे. कोरोना काळात अविरत पणे केलेले काम ही आमच्या कामाची पोच पावती आहे. जसे शिक्षण क्षेत्रात आमचे काम आहे, तसेच काम शुद्ध पाणी गावागावांत देण्याचा आमचा संकल्प आहे, असे त्‍यांनी सांगितले. यावेळी उमटे धरण संघर्ष गृपचे पदाधिकारी अँड. राकेश पाटील यांच्यासह संघर्ष गृपचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात भरपूर पाऊस पडतो. मात्र, सरकारी यंत्रणेकडे पाणी आडवा पाणी जिरवा, छोटे छोटे डॅम तयार करणे, अशी यंत्रणा नाही. डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी, नैसर्गिक झर्‍यांचे पाणी थेट समुद्रात जाते आणि आपल्या जिल्ह्याला, तालुक्याला एप्रिल, मे महिन्यांत दुष्काळाला सामोरे जावे लागते ही शोकांतिका आहे.

जनतेला हक्काचे शुद्ध पाणी मिळवून देण्याच्या या लढ्यामध्ये कोणीही राजकारण करू नये. आपण जर सर्वजण एकत्र राहिलो तर या अशा कठीण परिस्थितीवर नक्कीच मात करू शकतो. मला सर्वांना आवाहन करायचे आहे की, जसे आम्ही गाळ काढण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. तसेच, इतरांनी सुद्धा पोकलेन, डंपर, जेसीबी इतर यंत्रसामुग्री देवून हातभार लावावा आणि हा गाळ काढण्यासाठी प्रयत्न करावेत.

चित्रलेखा नृपाल पाटील (चिऊताई),
शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख

उमटे धरणाचा गाळ काढण्याच्या बाबतीत पाणीपुरवठा विभाग अपयशी ठरला आहे. उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना तसेच सर्वच राजकीय नेत्यांना व सर्व ग्रामपंचायतींना जाहीर आवाहन करतो की, धरणाचा गाळ काढण्यासाठी पैसे नका देऊ पण पोकलन, डंपर, जेसीबीची मदत देऊन आपण खारीचा वाटा उचलून आमच्या संघर्षाला मदत करावी.

अँड. राकेश पाटील,
उमटे धरण संघर्ष ग्रुप
Exit mobile version